उस्मानाबाद - घराजवळील विहिरीत निर्माल्य टाकण्यासाठी १९ वर्षीय युवती गेली असता पायात बेडूक आल्याने घाबरून ती पाण्यात पडली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या ६८ वर्षीय आजीने धाडसाने विहिरीत उडी मारून नातीला वाचवले. हा थरार रविवारी (दि.२८) सकाळी भागीरथीनगर येथे घडला. तरुणांनाही लाजवेल असे धाडस करून नातीचे प्राण वाचवणा-या आजीचे कौतुक होत आहे.
उस्मानाबाद शहरातील भागीरथीनगरात वैजयंता पंडित काटे राहतात. त्यांची घोगरेवाडी (ता. उस्मानाबाद) येथील नात शुभांगी प्रकाश झांजे त्यांच्याकडे शिक्षणासाठी राहते. रविवारी सकाळी निर्माल्य टाकण्यासाठी ती विहिरीकडे गेली होती. निर्माल्य टाकत असतानाच पायात बेडूक घुटमळल्याने घाबरून ती विहिरीत पडली. याचवेळी आजी वैजयंता यांनी, ‘शुभांगी कोठे आहे’, असे त्यांच्या सुनेला विचारले. ती निर्माल्य विहिरीत टाकण्यासाठी गेल्याचे सुनेने सांगितले.
आजीने बाहेर येऊन पाहिले असता काठावर शुभांगी दिसली नाही. त्यामुळे धावत जाऊन त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता शुभांगी पाण्यात बुडत असल्याचे त्यांना दिसले. क्षणाचाही विलंब न लावता आजीने पाण्यात उडी मारून नातीला वाचवले. वैजयंता काटे यांना लहानपणापासून पोहता येते. असे असले तरीही वयाच्या ६८ व्या वर्षीही धाडस दाखवल्याने तसेच समयसूचकतेमुळे नातीचे प्राण वाचवण्यात त्यांना यश मिळाले.
( छायाचित्र - विहिरीत पडलेल्या शुभांगी हिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उजवीकडे शुभांगीला वाचवणा-या आजी वैजयंता काटे.)