आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ground Report Of Marathwada For Maharashtra Assembly Election

मराठवाडाचा ग्राउंड रिपोर्ट: भाजप घेणार झेप, सेनेच्या मार्गात काटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या वेळी मराठवाड्यातील ४६ पैकी ३० जागा पटकावत आघाडी घेतलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला यंदा आघाडीतील फुटीची व आघाडी सरकारविरोधी रोषाची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचे दिसते. दुसरीकडे, मोदी लाटेवर स्वार व मुंडे यांच्या सहानुभूतीच्या जोरावर धडक मारण्यास सज्ज झालेला भाजप यंदा आपले संख्याबळ इतरांनी दखल घेण्याइतपत निश्चितच वाढवणार यात शंका राहिलेली नाही. मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या वेळी प्रथमच स्वबळ आजमावण्याचा प्रयत्न करत असलेले शिवसैनिक प्रत्येक जिल्ह्यात ठिकठिकाणी भगवा फडकावण्यासाठी झटत आहेत. मात्र, त्यांना पूर्वाश्रमीच्या मित्राकडून म्हणजेच भाजपकडून होणा-या मतविभाजनाच्या संकटाला जागोजागी सामोरे जावे लागणार आहे.
उस्मानाबाद जागा ४
मतफुटीचा राष्ट्रवादीला फायदा
उस्मानाबादेत राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात सामना असला तरी भाजपचे संजय दुधगावकर हेही चांगलेच सक्रिय आहेत. मोदींच्या सभेचा प्रभाव वाढल्यास सेनेला फटका बसून राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो. तुळजापूरमध्ये सर्वच पक्षांच्या बड्या नेत्यांच्या सभेमुळे रंगत वाढली आहे. मात्र काँग्रेसचे मधुकर चव्हाण यांची मजबूत बांधणी आणि विरोधकांच्या मतांमध्ये होणारे विभाजन याचा त्यांना फायदा होऊ शकतो. उमरग्यात शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा सामना रंगला आहे. तरीही सेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना पुन्हा संधी मिळू शकते. परंड्यात शिवसैनिक एकवटले असले तरी दुस-या गटाचे शंकर बोरकर लिंगायत मतांचे दान कोणाच्या पारड्यात टाकतात यावर सेनेचे भवितव्य आहे. दुसरीकडे पाच वर्षे नॉट रिचेबल राहिलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना अजित पवारांच्या सभेने किंचित बळ आले आहे. मात्र, रासपच्या उमेदवारासाठीही बड्या नेत्यांच्या सभा झाल्याने तिरंगी सामना पाहायला मिळत आहे. सद्य:स्थितीत सेनेच्या ज्ञानेश्वर पाटील यांना अनुकूल स्थिती असल्याचे दिसून येत आहे.
लातूर जागा ६
देशमुखांची प्रतिष्ठा पणाला
विलासराव देशमुखांच्या पश्चात होणारी ही पहिलीच निवडणूक. लातूर शहर मतदारसंघात काँग्रेसचे अमित देशमुख, भाजपचे शैलेश लाहोटी आणि राष्ट्रवादीच्या मुर्तुजा खान यांच्यात लढत होत आहे. मुस्लिमांची जादा मते खान यांना मिळाली तर काँग्रेसचा पराभव आणि ही मते काँग्रेसकडे गेली तर देशमुखांचा विजय निश्चित आहे. लातूर ग्रामीणमध्ये भाजपचे रमेश कराड व काँग्रेसचे त्र्यंबक भिसे यांच्यातच खरी लढत आहे. त्यात कराड यांचे पारडे सध्या जड आहे. औशात काँग्रेसचे बसवराज पाटील, भाजपकडून पाशा पटेल, सेनेकडून दिनकर माने आणि राष्ट्रवादीकडून राजेश्वर बुके रिंगणात आहेत. सध्या तरी काँग्रेसचे पारडे जड आहे. अहमदपूरमध्ये काँग्रेसकडून विठ्ठल माकणे, राष्ट्रवादीकडून बाबासाहेब पाटील, तर अपक्ष म्हणून विनायक पाटील हे प्रमुख स्पर्धक आहेत. सध्या अपक्ष पाटील यांचे पारडे जड आहे. उदगीर या राखीव मतदारसंघात भाजपचे आमदार सुधाकर भालेराव, राष्ट्रवादीकडून संजय बनसोडे, काँग्रेसकडून रामकिशन सोनकांबळे यांच्यातच खरी लढत आहे. भालेरावांबद्दल जनतेत नाराजी आहे. त्यामुळे बनसोडे यांचे पारडे सध्या जड वाटते.

बीड जिल्हा जागा ६
मुसंडी मारण्यासाठी भाजपचे शर्थीचे प्रयत्न
गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात होणा-या या पहिल्याच निवडणुकीत सहानुभूतीच्या जोरावर भाजप जिल्ह्यात मुसंडी मारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांच्याविरुद्ध विनायक मेटे (भाजप), अनिल जगताप (शिवसेना) आणि प्रा. सुनील धांडे (मनसे) हे मराठा उमेदवार आहेत. मुस्लिम मतदान काँग्रेसकडे किती वळते यावरच क्षीरसागरांचे भवितव्य ठरणार आहे. आष्टीत राष्ट्रवादीचे सुरेश धस व भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांची चुरशीची लढत आहे. गेवराईत दोन्ही पंडित एकत्र आल्याने सुरुवातीला राष्ट्रवादीच्या बदामराव पंडितांना निवडणूक सोपी जाईल, असे चित्र होते. परंतु मोदी लाट व मुंडेंविषयीची सहानुभूती भाजपचे लक्ष्मण पवार यांच्या पथ्यावर पडू शकते. माजलगावात राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांना बंडखोरांनी घेरले आहे. रमेश आडसकर भाजपत दाखल झाले तर मोहन जगताप, सहाल चाऊस यांनी राष्ट्रवादीत राहूनच बंड पुकारले आहे. त्यामुळे भाजपचे आर. टी. देशमुख यांना आयतेच पाठबळ मिळाले. केजमध्ये चार महिलांमध्ये सामना रंगणार आहे. राष्ट्रवादीच्या दिवंगत मंत्री विमलताई मुंदडा यांच्या स्नुषा नमिता यांच्यासाठी सासरे नंदकिशोर मुंदडा व पती अक्षय यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपच्या संगीता ठोंबरे, भाजपने उमेदवारी नाकारताच काँग्रेसकडून मैदानात आलेल्या अंजली घाडगे तसेच शिवसेनेच्या कल्पना नरहिरे याही प्रचारात अग्रेसर आहेत. यात नमिता यांची बाजू प्रबळ दिसते. परळीत बहीण-भावांमधील लढत लक्षवेधी आहे. मुंडेंची सहानुभूती, मोदींकडून मिळालेले प्रशस्तिपत्र या बळावर पंकजा मुंडे राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांना लढत देत आहेत. दांडगा जनसंपर्क, अजित पवार यांच्या पाठबळावर आणलेला निधी ही धनंजय यांची जमेची बाजू आहे. काँग्रेसचे टी. पी. मुंडे कितपत मते घेतात यावर समीकरणे अवलंबून आहेत.
औरंगाबाद जागा ९
विद्यमान आमदार संकटात, सर्वत्र चुरस
औरंगाबादेतील तीनही मतदारसंघांत विद्यमान आमदारांसमोर कडवे आव्हान आहे. पूर्वमध्ये काँग्रेसचे राजेंद्र दर्डा व भाजपचे अतुल सावे यांच्यात चुरस आहे. मात्र अपक्ष उत्तमसिंह पवार, शिवसेनेच्या कला ओझा, एमआयएमचे गफार कादरी व राष्ट्रवादीचे जुबेर मोतीवाला यांनीही चुरस वाढवली आहे. पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे संजय शिरसाट यांना भाजपचे मधुकर सावंत व काँग्रेसच्या जितेंद्र देहाडेंचे आव्हान आहे. ‘मध्य’मध्ये शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल व भाजपचे किशनचंद तनवाणी या दोन मित्रांत खरी लढत आहे. राष्ट्रवादीचे विनोद पाटील, काँग्रेसचे एम. एम. शेख आणि एमआयएमचे इम्तियाज जलील हेही ‘जायंट किलर’ ठरू शकतात. मतांच्या धुव्रीकरणावर विजयाचे गणित ठरणार आहे. पैठणमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संजय वाघचौरे व शिवसेनेचे संदिपान भुमरे यांच्यात सरळ लढत आहे. परंतु मनसे, भाजप, कॉँग्रेस किती मते घेतात यावरच निकाल अवलंबून आहे. वैजापूरात शिवसेनेचे आमदार आर. एम. वाणी विरुद्ध राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर यांच्यात लढत असून यंदा बदलाची चिन्हे आहेत. गंगापुरात भाजपचे प्रशांत बंब, शिवसेनेचे अंबादास दानवे, काँग्रेसच्या शोभा खोसरे, तर राष्ट्रवादीचे कृष्णा पाटील डोणगावकर ही चुरशीची लढत आहे. फुलंब्रीत भाजपचे हरिभाऊ बागडे, काँग्रेसचे कल्याण काळे, राष्ट्रवादीच्या अनुराधा चव्हाण यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. दोन्ही काँग्रेसमधील मतविभाजनाचा भाजपला फायदा होऊ शकतो. सिल्लोडमध्ये काँग्रेसचे अब्दुल सत्तार व भाजपचे सुरेश बनकर यांच्यात थेट लढत होणार आहे. कन्नडमध्ये राष्ट्रवादीचे उदयसिंग राजपूत, काँग्रेसचे नामदेव पवार, शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव, भाजपचे संजय गव्हाणे यांच्यात लढत आहे. येथील सर्वच उमेदवार कोलांटउड्या मारून आल्याने अंदाज वर्तवणे कठीण आहे.

नांदेड जागा ९
चव्हाणांच्या प्रतिष्ठेची लढाई
गेल्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीला सर्वच्या सर्व ९ जागा मिळवून
देणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची यंदा मात्र प्रतिष्ठेची लढाई आहे. भोकरमधून त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण व भाजपचे माधवराव किन्हाळकर यांच्यात चुरशीची लढत आहे. नांदेड दक्षिणमध्ये भाजप, शिवसेना व एमआयएममध्ये काट्याची लढत होईल. काँग्रेसचे ओमप्रकाश पोकर्णा काहीसे मागे सरकल्यासारखे वाटतात. नांदेड उत्तरमध्ये काँग्रेसचे डी. पी. सावंत यांना प्रबळ विरोधक दिसत नाहीत. हदगावमध्ये काँग्रेसचे माधवराव पाटील व शिवसेनेचे नागेश आष्टीकर यांच्यात लढत आहे. लोह्यात शिवसेनेचे प्रताप पाटील, भाजपचे मुक्तेश्वर धोंडगे, राष्ट्रवादीचे शंकर धोंडगे अशी तिरंगी लढत आहे. नायगावात राष्ट्रवादीचे बापूसाहेब गोरठेकर, काँग्रेसचे वसंत चव्हाण हेच प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. किनवटमध्ये अपक्ष भीमराव केराम यांनी राष्ट्रवादीचे प्रदीप नाईकांना आव्हान दिले आहे. मुखेडमध्ये भाजपचे गोविंदराव राठोड यांची काँग्रेसच्या हणमंत पाटलांशी तर देगलूरमध्ये काँग्रेसचे अंतापूरकर यांची शिवसेनेचे सुभाष साबणे यांच्याशी चुरशीची लढाई आहे.
जालना जागा ५
दानवे, टोपेंची दमछाक
घनसावंगीत भाजपचे विलास खरात, शिवसेनेचे हिकमत उढाण, मनसेचे सुनील आर्दड हे राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपेंची दमछाक करत आहेत. भोकरदनमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष यांची राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवेंशी लढत आहे. दानवेंना जनसंपर्काचा फायदा होऊ शकला तरी भाजपतून सेनेत गेलेले रमेश गव्हाड यांचा धोकाही नाकारता येणार नाही. जालन्यात काँग्रेसचे कैलास गोरंट्याल व शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यात चुरस आहे. येथे राष्ट्रवादीचे अरविंद चव्हाण यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मनसेचे रवी राऊत, राष्ट्रवादीचे खुशालसिंह हेही मैदानात आहेत. त्यामुळे निकालाचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. परतूरमध्ये काँग्रेसचे सुरेश जेथलियांना सेनेचे सोमनाथ साखरे, भाजपचे बबनराव लोणीकर, राष्ट्रवादीचे राजेश सरकटे, मनसेचे बाबासाहेब आकात यांचे आव्हान आहे. पंचरंगी लढत जेथलियांच्या पथ्यावर पडू शकते. बदनापूरमध्ये सेनेचे संतोष सांबरे यांना भाजपचे नारायण कुचे, राष्ट्रवादीचे बबलू चौधरी, मनसेचे ज्ञानेश्वर गायकवाड यांचे आव्हान आहे. सेनेला मतविभाजनाचा फटका बसू शकतो.
परभणी जागा ४
‘लक्ष्मीदर्शना’चीच स्पर्धा
परभणीत काँग्रेसच्या इरफानूर रहेमान खान व एमआयएमचे सज्जुलाला यांच्यात मुस्लिम मतांचे विभाजन होऊ शकते. शिवसेनेचे डॉ. राहुल पाटील यांच्यासमोर भाजपचे आनंद भरोसे यांचे आव्हान आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार महापौर प्रताप देशमुखांची मदारही दलित, मुस्लिम मतांसह हिंदू व्होट बँक फोडण्यावर आहे. त्यामुळे येथील लढत फारच चुरशीची ठरत आहे. जिंतुरात रामप्रसाद बोर्डीकर यांना राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांच्यासह भाजपच्या संजय साडेगावकरांशी सामना करावा लागेल. पाथरीत काँग्रेसचे सुरेश वरपुडकर व राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांच्यातील मतविभागणीचा फायदा शिवसेनेच्या आमदार मीरा रेंगे यांना होऊ शकतो. अपक्ष मोहन फड व मनसेचे हरिभाऊ लहाने रेंगेंसाठी तापदायक ठरू शकतात. गंगाखेडमध्ये अपक्ष आमदार सीताराम घनदाट व रासपचे रत्नाकर गुट्टे यांच्यातील ‘लक्ष्मीदर्शना’ची स्पर्धा पाहून राष्ट्रवादीचे मधुसूदन केंद्रेदेखील तयारीनिशी रिंगणात आहेत.
हिंगोली जागा ३
राष्ट्रवादी, भाजपचे पारडे जड
जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांत काट्याची टक्कर होत आहे. हिंगोलीत काँग्रेसचे आमदार भाऊ पाटील गोरेगावकर, भाजपचे तानाजी मुटकुळे, राष्ट्रवादीचे दिलीप चव्हाण आणि शिवसेनेचे दिनकर देशमुख हे प्रमुख उमेदवार स्पर्धेत आहेत. तरीही मुख्य लढत काँग्रेस व भाजपतच होऊ शकते. त्यातही जातीय समीकरणे व मतदारांचा कल पाहता भाजपला संधी मिळण्याची चिन्हे आहेत. कळमनुरीत काँग्रेसचे डॉ. संतोष टारफे, राष्ट्रवादीचे शिवाजी माने, सेनेचे गजानन घुगे हे प्रमुख स्पर्धक आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीत खरी लढत असून एकगठ्ठा मराठा मते मिळाल्यास राष्ट्रवादीला फायदा मिळू शकतो. वसमतमध्ये काँग्रेसचे अब्दुल हाफ‍िज, राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर, शिवसेनेचे डॉ. जयप्रकाश मुंदडा, भाजपचे शिवाजी जाधव यांच्यात चुरस आहे. दलित मते राष्ट्रवादीकडे वळल्यास दांडेगावकरांचा विजय सोपा होऊ शकतो. शिवसेना-भाजपला मात्र मतविभागणीचा फटका बसू शकतो.