आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ground Report Of Marathwada In Maharashtra Assembly Election 2014, Divya Marathi

मराठवाडाचा ग्राउंड रिपोर्ट: अशोकराव-पंकजांच्या नेतृत्वाचा लागणार कस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे या दिग्गजांच्या पश्चात होणारी ही पहिलीच निवडणूक. आघाडी सरकारच्या कारभारामुळे जनतेत नाराजी असताना राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांना ‘संस्थानं’ वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यामुळे मुंडेंची सहानुभूती व मोदींच्या लाटेवर स्वार झालेला भाजपही मुसंडी मारू पाहत आहे. शिवसेनेला मात्र अस्तित्व राखण्यासाठी मोठी लढाई लढावी लागेल. काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण, तर भाजपमध्ये पंकजा यांच्या रूपाने राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याची येथील जनतेची भावना आहे.
* जालना ( 0५ जागा)
राजेश टोपेंना आव्हान खरातांचे
जिल्ह्यात पाच मतदारसंघांपैकी राष्ट्रवादीकडे दोन व काँग्रेस, शिवसेना व अपक्षाकडे प्रत्येकी एक जागा. राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे यांना घनसावंगीत काँग्रेसचे माजी आमदार व भाजपचे उमेदवार विलास खरात यांचे तगडे आव्हान आहे. मनोहर जोशींचे स्वीय सहायक हिकमत उढाण हेही शिवसेनेकडून रिंगणात आहेत. जालना शहरात काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल व सेनेच्या अर्जुन खोतकर यांच्यात सरळ लढत होणार आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार व आता भाजपचे उमेदवार अरविंद चव्हाण हेही चुरस देतील.
परतूरमधील अपक्ष आमदार सुरेश जेथलिया काँग्रेसचे उमेदवार आहेत. भाजपचे बबनराव लोणीकर, राष्ट्रवादीचे उमेदवार व गायक राजेश सरकटे, शिवसेनेचे सोमनाथ साखरे व मनसेचे बाबासाहेब आकातही स्पर्धेत आहेत. खरी लढत काँग्रेस, भाजपतच असेल. बदनापूरमध्ये काँग्रेसचे सुभाष मगर, राष्ट्रवादीचे बबलू चौधरी, सेनेचे संतोष सांबरे, भाजपचे नारायण कुचे व मनसेचे माउली गायकवाड हे रिंगणात असल्याने पंचरंगी लढत होईल. भोकरदनमध्ये भाजपकडून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष व राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत दानवे यांच्यात खरी लढत आहे.
* उस्मानाबाद ( 0४ जागा)
पद्मसिंहांच्या प्रतिष्ठेला आव्हान
जिल्ह्यातील चारपैकी शिवसेनेकडे दोन, तर काँग्रेस- राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक जागा आहे. राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील यांच्या लोकसभेतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे. पद्मसिंह यांचे पुत्र राणा जगजितसिंह यांना शिवसेनेचे ओमराजे यांनी उस्मानाबादेत पराभूत केले होते. या वेळी पुन्हा हे भाऊ आमने- सामने आहेत, तर भाजपकडून संजय दुधगावकर, काँग्रेसचे विश्वास शिंदे, मनसेचे संजय यादव यांच्यामुळे मतविभाजन अटळ आहे. तुळजापुरात काँग्रेसचे माजी मंत्री मधुकर चव्हाण पुन्हा रिंगणात आहेत. शिवसेनेचे सुधीर पाटील, भाजपचे संजय निंबाळकर, राष्ट्रवादीचे जीवन गोरे आणि मनसेचे देवानंद रोचकरी यांच्यातील मतविभाजनामुळे चव्हाणांना पुन्हा संधी मिळू शकते. परंड्याची जागा भाजपने रासपचे बाळासाहेब पाटील यांना साेडली आहे. राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटे, शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटील आणि काँग्रेसचे नुरुद्दीन चौधरी अशी येथील लढत आहे, तर उमरग्यात ज्ञानराज चौघुले (शिवसेना), कैलास शिंदे (भाजप), किसन कांबळे (काँग्रेस), राष्ट्रवादीचे डॉ. संजय गायकवाड व मनसेचे विजय क्षीरसागर या बहुरंगी लढतीचा वेध घेणे अवघड बनले आहे.
हिंगोली ( 0३ जागा)
राजीव सातवांची जबाबदारी वाढली
जिल्ह्यातील तीनपैकी दोन जागा काँग्रेसकडे व एक राष्ट्रवादीकडे आहे. वसमतमध्ये शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा व राष्ट्रवादीचे आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांच्यात चुरस आहे. दिल्लीत वकिली करणा-या शिवाजीराव जाधव यांना भाजपने, तर काँग्रेसने नगराध्यक्ष हाफिज रहेमान यांना रिंगणात उतरवून रंगत वाढवली आहे. कळमनुरीत शिवसेनेचे गजानन घुगे, राष्ट्रवादीचे शिवाजी माने व काँग्रेसचे संतोष तरफे यांच्यात तिरंगी लढत होईल. हिंगोलीतही काँग्रेसचे भाऊसाहेब गोरेगावकर, भाजपच्या तानाजी मुटकुले व राष्ट्रवादीचे दिलीप चव्हाण अशी तिरंगी लढत होईल. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचे पानिपत झालेले असताना केवळ नांदेड व हिंगोली या जिल्ह्यांनी काँग्रेसचे खासदार निवडून देत पक्षाची इभ्रत वाचवली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला तीनही मतदारसंघातून मोठी अपेक्षा आहे.
नांदेड ( 0९ जागा)
पक्षफुटीचा धक्का काँग्रेसला बसणार
जिल्ह्यातील नऊपैकी पाच जागा काँग्रेसकडे, तर राष्ट्रवादी व अपक्षांकडे प्रत्येकी दोन जागा आहेत. भास्करराव खतगावकर, माधवराव किन्हाळकर व सूर्यकांता पाटील हे दिग्गज नेते नुकतेच भाजपत गेल्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या पत्नी अमिता भोकरमधून निवडणूक लढवत आहेत. भाजपचे माधव किन्हाळकर यांच्याशी त्यांची खरी लढत होईल. लोह्यात शिवसेनेचे प्रताप पाटील चिखलीकर आणि राष्ट्रवादीचे आमदार शंकर धोंडगे यांच्यात खरी लढत आहे. चिखलीकरांच्या ताकदीला यंदा शिवसेनेची जोड आहे. मनसेचे रोहिदास चव्हाण, भाजपचे मुक्तेश्वर धोंडगे यांच्यामुळे चिखलीकरांना फटका बसू शकतो. नांदेड दक्षिणमध्ये काँग्रेसचे आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्याविरोधात भाजपचे दिलीप कुंदकुर्ते, शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी आव्हान उभे केले आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन मुख्तार हे सर्वांचे गणित बिघडवू शकतात. उत्तर-दक्षिण नांदेडमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री डी.पी. सावंत यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या सुनील कदम यांनी दंड थोपटले आहेत. भाजपकडून सुधाकर पांढरे, तर शिवसेनेकडून मिलिंद देशमुख रिंगणात आहेत.
बीड ( 0६ जागा)
गोपीनाथ मुंडेंच्या सहानुभूतीची लाट
जिल्ह्यातील सहापैकी पाच जागा राष्ट्रवादीकडे, तर एक भाजपकडे आहे. राज्याचे लक्ष असलेल्या परळीत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा व पुतणे धनंजय मुंडे या बहीण-भावात चुरशीची लढत होत आहे. पंकजा यांच्यासह भाजपच्या सर्व उमेदवारांना मुंडेंच्या सहानुभूतीचा फायदा होऊ शकतो. केजमध्ये विमल मुंदडा यांच्या स्नुषा व राष्ट्रवादीच्या उमेदवार नमिता यांची लढत भाजपच्या संगीता ठोंबरे, सेनेच्या कल्पना नरहिरेंशी आहे. या मतदारसंघात चारही प्रतिस्पर्धी महिलाच आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांना विनायक मेटेंचे आव्हान असेल. सेनेचे अनिल जगताप, काँग्रेसचे सिराज देशमुख, मनसेच्या सुनील धांडेंना चमत्काराची आशा आहे. आष्टीत राष्ट्रवादीचे सुरेश धस, भाजपचे भीमराव धोंडे यांच्यात सरळ लढत आहे. माजलगावला राष्ट्रवादीचे प्रकाश साळुंके व भाजपचे आर. टी. देशमुख अशी थेट लढत होईल. गेवराईत राष्ट्रवादीचे आमदार बदामराव पंडित व भाजपचे लक्ष्मण पवार अशी लढत आहे. शिवसेना (अजय दाभाडे), काँग्रेस (सुरेश हत्ते) मनसेचे राजेंद्र मोटे हेही रिंगणात आहेत. या वेळी बदामराव व अमरसिंह या काका-पुतण्यात मनोमिलन झाल्याचा फायदा पंडितांना मिळू शकतो.
परभणी ( 0४ जागा)
बालेकिल्ल्यात शिवसेनेला आव्हान
परभणी जिल्ह्यातील चारपैकी दोन जागा शिवसेनेकडे व काँग्रेस- अपक्षाकडे प्रत्येकी एक जागा. पाथरीत काँग्रेसचे सुरेश वरपुडकर, सेनेच्या मीरा रेंगे पाटील, मनसेचे हरिभाऊ लहाने हे तीनही मराठा उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्रानी यांच्यामागे मुस्लिम मतांची ताकद आहे. परभणीत शिवसेनेच्या राहुल पाटील, भाजपच्या आनंद भरोसे यांच्यात चुरस आहे. काँग्रेसचे इरफान खान व एमआयएमचे सज्जूलाला यांचा मुस्लिम मतांवर दावा असेल. गंगाखेडमध्ये ‘लक्ष्मी’दर्शनाचा खेळ रंगला आहे. अपक्ष आमदार सीताराम घनदाट, ‘रासप’चे रत्नाकर गुट्टे आणि राष्ट्रवादीचे मधुसूदन केंद्रे यांच्यात चुरस आहे. जिंतूरमध्ये काँग्रेसचे रामप्रसाद बोर्डीकर व राष्ट्रवादीचे विजय भांबळे खरे स्पर्धक आहेत.
लातूर ( 0६ जागा)
‘देशमुखी’ कायम राहणार
जिल्ह्यातील सहापैकी काँग्रेसला चार, भाजप व रासपकडे प्रत्येकी एक जागा आहे. विलासराव देशमुखांच्या पश्चात त्यांचे बंधू दिलीपराव व पुत्र अमित देशमुखांच्या नेतृत्वाची कसोटी लागेल. लातुरात चौरंगी लढत होणार असली, तरी काँग्रेसच्या अमित देशमुखांना पुन्हा संधीची आशा आहे. ग्रामीणमध्ये सेनेचे हरिभाऊ साबदे, भाजपचे रमेश कराड, काँग्रेसचे त्र्यंबक भिसे, राष्ट्रवादीच्या आशा भिसे अशी चौरंगी लढत होईल. निलंग्यात काँग्रेसचे अशोक निलंगेकर विरुद्ध भाजपचे संभाजी निलंगेकर या काका- पुतण्याची लढत आहे. अहमदपूर, औसा, उदगीरमधील मतविभाजनामुळे अंदाज बांधणे कठीण आहे. औशात पाशा पटेलांचा कस लागणार हे नक्की.

औरंगाबाद ( 0९ जागा)
औरंगाबादेत कट टू कट लढती
जिल्ह्यातील सर्व ९ मतदारसंघांत काट्याच्या लढती आहेत. सिल्लोडमध्ये काँग्रेसचे अब्दुल सत्तार, भाजपचे सुरेश बनकर यांच्यात थेट लढत होणार आहे. वैजापुरात शिवसेनेचे आर. एम. वाणी, काँग्रेसचे दिनेश परदेशी, राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर यांच्यात चुरस आहे. कन्नडमध्ये यंदा हर्षवर्धन जाधव मनसेऐवजी सेनेचे, शिवसैनिक संजय गव्हाणे भाजपचे, शिवसेनेचे माजी आमदार नामदेव पवार काँग्रेसचे, तर उदयसिंग राजपूत राष्ट्रवादीचे, सुभाष पाटील मनसेचे उमेदवार आहेत. येथे राजपूत, गव्हाणे आणि जाधव यांची तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. गंगापुरात शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, भाजपचे प्रशांत बंब यांचा कस लागणार आहे. पैठणमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संजय वाघचौरे, काँग्रेसचे रवींद्र काळे, मनसेचे डॉ. सुनील शिंदे, शिवसेनेचे संदिपान भुमरे अशी चौरंगी लढत येथे होईल. फुलंब्रीत भाजपचे हरिभाऊ बागडे, काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे, राष्ट्रवादीच्या अनुराधा चव्हाण यांच्यात तगडी लढत अपेक्षित आहे. शिवसेनेचे राजेंद्र ठोंबरे, मनसेचे भास्कर गाडेकर यांच्याकडे जाणारी मते निर्णायक ठरतील. औरंगाबाद पश्चिममध्ये सेनेचे संजय शिरसाट यांना भाजपच्या मधुकर सावंतांशी झुंजावे लागेल. काँग्रेसचे जितेंद्र देहाडे व मनसेचे गौतम आमराव हेही रिंगणात आहेत. मध्यमध्ये भाजपचे किशनचंद तनवाणी, सेनेचे प्रदीप जैस्वाल, राष्ट्रवादीचे विनोद पाटील, काँग्रेसचे एम. एम. शेख, मनसेचे राजगौरव वानखेडे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील आहेत. हिंदू-मुस्लिम मतांत विभागणी तसेच जैस्वाल- तनवाणी- एमएम यांची तिरंगी लढत अपेक्षित आहे. ‘पूर्व’मध्ये काँग्रेसचे राजेंद्र दर्डा, भाजपचे अतुल सावे यांच्यात लढत होणार तरी अपक्ष उत्तमसिंह पवार, राष्ट्रवादीचे जुबेर मोतीवाला, एमआयएमचे गफ्फार काद्री यांच्यावर सर्व गणिते अवलंबून राहतील.