आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धवेळ पालकमंत्रिपदही लातूरकरांना लाभेना, पालकमंत्री पंकजा मुंडेही स्वजिल्ह्यातच व्यग्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - पाच वर्षांपासून लातूर जिल्ह्याला स्वजिल्ह्यातील पालकमंत्री मिळालेला नाही. यापूर्वीच्या आघाडी सरकारमध्ये पालकमंत्री असलेल्या सतेज पाटील यांचाच कित्ता गिरवत नव्या सरकारने नियुक्त केलेल्या पंकजा मुंडे यांनीही लातूरकरडे पाठ फिरवली आहे. नुकत्याच झालेल्या गारपिटीत शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी त्याचा आढावा घेण्यासाठीही पालकमंत्र्यांकडे वेळ मिळाला नसल्यामुळे लातूरकरांना पोरके झाल्याची भावना आहे.

साडेसात वर्षे राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळालेल्या लातूर जिल्ह्यात त्या काळात कोण पालकमंत्री आहे याला फारसे महत्त्वच नव्हते. कारण तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख लातूरचे सगळे प्रश्न एकहाती सोडवायचे. मुळात प्रश्न निर्माण व्हायच्या आतच त्यावर तोडगा निघालेला असायचा. त्यामुळे त्या वेळचे पालकमंत्री नावापुरतेच असायचे. लोकांनाही काही अडचणी आल्या तर त्या थेट विलासरावांच्या कानावर घातल्या जाऊ शकायच्या. त्या वेळी पालकमंत्री असलेले आनंदराव देवकते आणि बाळासाहेब थोरात फारसे चर्चेत नसायचे. आणि विलासराव किमान पंधरा दिवसाला एकदा लातूरला यायचे. त्यामुळे प्रोटोकॉल म्हणून तरी पालकमंत्र्यांना त्यांच्यासोबत यावे लागायचे. पहिल्या वेळेस विलासरावांचे मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर त्यांचे बंधू वित्त राज्यमंत्री झाले आणि लातूरचे पालकमंत्रिपद त्यांच्याकडे आले. त्यामुळे त्या वेळेसही लातूरच्या पालकत्वाची अडचण आली नाही. दुसऱ्यांदा पद गेल्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्याकडे पालकमंत्रिपद कायम राहिले. खरी अडचण सुरू झाली ती अशोक चव्हाण दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर. त्या वेळी कोल्हापूरच्या सतेज पाटील यांच्याकडे लातूरचे पालकत्व आले. केवळ विलासराव देशमुख लातूरच्या दौऱ्यावर असले तरच सतेज पाटील लातूरला यायचे. एरवी ते लातूरकडे फिरकायचेच नाहीत. विलासरावांच्या निधनानंतर सतेज पाटील महिना-दोन महिने फिरकायचेच नाहीत. गेल्या वर्षी निवडणुकांपर्यंत हिच परिस्थिती होती. शेवटी-शेवटी तर त्यांनी मतदारसंघातील तयारीसाठी एवढा वेळ दिला की ते लातूरला आलेच नाहीत.

केवळ तीनवेळा लातूरचा दौरा
भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर लातूरमधून कुणाला मंत्रिपद मिळाले तर त्यांच्या हाती लातूरचे पालकमंत्रिपद सोपवले जाईल, अशी आशा होती. त्यासाठी सुधाकर भालेराव आणि संभाजी पाटील निलंगेकर देव पाण्यात घालून बसले होते. मात्र, त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. पुढे शेजारच्या पंकजा मुंडे यांच्याकडे लातूरचे पालकत्व सोपवण्यात आले. मात्र, त्यांनी आतापर्यंत केवळ तीन वेळा लातूरचा दौरा केला. बीडला त्या वारंवार येत असल्या तरी लातूरकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दोन महिन्यांत तर त्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांत व्यग्र असल्यामुळे त्यांचे लातूरला येणेच झालेले नाही. जिल्ह्यातील टंचाई, नुकतीच झालेली गारपीट या महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावाही पालकमंत्र्यांनी घेतलेला नाही.