आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यालय सहायकावर जालन्यात बंदूक रोखली, कर्मचा-यांकडून निषेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मुख्यालय सहायकास मारहाण करून बंदूक रोखण्याचा प्रकार मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास घडला. यामुळे भूमी अभिलेख कार्यालयासह सबंध इमारतीतील अधिकारी-कर्मचा-यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी नायक यांनी बंदूक रोखणा-या व्यक्तीचा शोध घेऊन त्याचा शस्त्र परवाना रद्द करण्यात येईल, असे सांगितले.

भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी-कर्मचा-यांनी दिलेल्या वेळेत कार्यालयात बसून जनतेची कामे करावी, या दृष्टीने बायोमेट्रिक यंत्रणा लावण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी ए.एस. आर. नायक यांनी स्पष्ट केले. जालना येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात नगर भूमापनाच्या ५० हजार मिळकत पत्रिका असून परिरक्षण भूमापकाची केवळ ३ पदे आहेत. यातही प्रत्यक्ष एकच पद कार्यरत असून २ पदे रिक्त आहेत. परिणामी वेळेत कामे न झाल्यास जनतेचा रोष वाढून कर्मचा-यांना मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षक हे अत्यंत महत्त्वाचे पद ३१ जानेवारी २०१४ पासून रिक्त आहे. हीच परिस्थिती अंबड, घनसावंगी, जाफराबाद कार्यालयातील उपअधीक्षकपदाची आहे. याशिवाय अन्य कर्मचा-यांची पदेही रिक्त अाहेत. यामुळे जनतेची कामे वेळेवर होत नाहीत. पीआर कार्ड, नामांतर, फेरफार आदी कामांसाठी ४-६ महिन्यांचा कालावधी लागत आहे. कामे जलद गतीने पूर्ण होत नसल्याने जनतेच्या राेषाला कर्मचारी वर्गास बळी पडावे लागत आहे.

मंगळवारी जालना उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहायक एम.एस. कोलते यांना एका व्यक्तीने मारहाण करून त्यांच्यावर बंदूक रोखली. यापूर्वी २४ फेब्रुवारी २०१५ रोजी अव्वल कारकून डी. टी. बागुले यांनाही धक्काबुक्की करण्यात आली होती. मात्र, यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तरीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विद्यानंद काळे यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख एस.एस. इंदलकर यांना भेटून माहिती घेतली. दरम्यान, मुख्यालय सहायक कोलते हे औरंगाबाद येथे मनपा निवडणुकीसाठी गेल्यामुळे ते आल्यावरच तक्रार दिली जाईल, असे इंदलकर यांनी सांगितले. या घटनेचा निषेध म्हणून जिल्ह्यातील कर्मचारी गुरुवारी व शुक्रवारी असे दोन दिवस काळ्या फिती लावून कार्यालयात काम करणार असल्याचे भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने निवेदनाद्वारे म्हटले आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष अनिल बी. देवकर, वर्ग ४ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एन. एन. मानकापे यांच्या स्वाक्ष-या आहेत.