आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदीची सुवर्णसंधी : आता कर्नाटक राज्यातून गुटख्याचा काळाबाजार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- गुटख्यावर बंदीचे आदेश येण्यापूर्वीच त्याची बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे गुटख्याचा स्टॉक करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर आगामी काळात शेजारील कर्नाटक राज्यातून गुटखा आयात करण्यासाठी पूर्वीच संबंधितांना बोलून ठेवण्यात आल्यामुळे गुटखा विक्रेते निश्चिंत आहेत. विशेष म्हणजे राज्य शासनाने बंदी आदेश लागू केला असला तरी गुटखा विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण नाही. उलट काळ्या बाजारात माल विकतानाचे थ्रील अनुभवतानाच जादा पैसे मिळतील अशी आशा त्यांना आहे. चिंता आहे ती गुटख्याचे सेवन करणा-यांना. त्यांना आता चार-दोन रुपये जादा मोजून गुटखा खावा लागेल.
गुटखाबंदीचे आदेश लागू होण्यापूर्वीच त्याचे सूतोवाच झाल्यामुळे महिनाभरापासूनच गुटखा विक्रेत्यांनी कर्नाटकातील वितरकांशी अगोदरच सूत जमवून ठेवले आहे. लातूर जिल्ह्याला लागून असलेल्या हुमनाबाद, भालकी, बीदर, बसवकल्याण, औराद बाराहाळी या भागांतील विक्रेत्यांना आठ दिवसांपूर्वीच निरोप गेले आहेत. तेथून लातूर जिल्ह्यात गुटखा आयात करण्याचा प्लॅन बनवण्यात आला आहे. त्या वेळी उदगीर हे सीमेवरचे शहर या व्यवसायाचे केंद्रबिंदू झाले होते. बंदी नसतानाच्या काळात पाच वर्षे गुटखा विकून जेवढे पैसे कमवले नाहीत त्याच्यापेक्षा जास्त पैसे लोकांनी गुटखाबंदीच्या काळात कमावले होते. एक रुपयाला मिळणारा गुटखा बंदीच्या काळात 3 ते 5 रुपयांना मिळत असे. त्यामुळे बंदी म्हणजे सुवर्णसंधी असे समजून रिस्क घेणारे व्यापारी गुटखाबंदीच्या निर्णयाकडे पाहत आहेत.