आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकांचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री - अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी तालुक्यात त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली. आतापर्यंत 50 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम आठवडाभरात पूर्ण होणार आहे.

तालुक्यात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. या गारपिटीमध्ये तालुक्यातील 8046 हेक्टरमधील रब्बी पिकांचे नुकसान झाले. फळबागा, कांदा, भाजीपाला ही पिकेसुद्धा गारपिटीने उद्ध्वस्त झाली.

पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी शासकीय यंत्रणा गतिमान झाली आहे. दोन दिवसापूर्वी केंद्रीय पथकाचे सदस्य विनोदकुमार यांनी जातेगाव येथे जाऊन पाहणी केली. पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनीसुद्धा गारपीटग्रस्त शेतकर्‍यांची भेट घेऊन त्यांना शासकीय पातळीच्या माध्यमातून मदत मिळेल असे सांगितले आहे. विभागीय आयुक्त संजीवकुमार व जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्या आदेशानुसार फुलंब्री तालुक्यात रब्बी पिकांचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक अशी तीनसदस्यीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यात केवळ 11 कृषी सहायक असल्यामुळे पंचनामे करण्यात उशीर होत आहे. त्यामुळे 92 गावांपैकी अर्ध्या गावातील पिकांचा पंचनामा येत्या आठवडाभरात होऊ शकतो. त्यामुळे शेतकर्‍याला मदतीसाठी किमान 15 दिवस वाट पाहावी लागणार आहे.

या वर्षी 13500 हेक्टरमध्ये रब्बी पिकांची पेरणी झाली होती. त्यापैकी 8046 हेक्टर रब्बी पिकांचे नुकसान झाल्याचा शासकीय
आकडा आहे.

पंचनामे आठवड्यात करू
शासनाच्या आदेशाप्रमाणे फुलंब्री तालुक्यात पिकांचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहे. आठवडाभरात काम पूर्ण होईल. - रेवणनाथ लबडे, तहसीलदार

50 टक्के काम पूर्ण
तीन सदस्यांमार्फत पंचनामे सुरू आहेत. मात्र, 92 गावांसाठी केवळ 11 कृषी सहायक असल्याने आतापर्यंत 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. - विजय कासलीवाल, तालुका कृषी अधिकारी