आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडवणीसह केज, धारूर, परळी, लातूर तालुक्यात गारपीट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - जिल्ह्यातील वडवणीसह केज व धारूर, परळी तालुक्यातील गावांना वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात गारपिटीने झोडपून काढले. भाजीपाल्यासह अांबे, डाळिंब फळबागांचे मोठे नुकसान झाले.

वडवणी तालुक्यात रविवारी दुपारी अडीच वाजता चिंचवण, सोन्ना खोट्टा, कोठारबन, पिंपळटक्का येथे गारांमुळे छोट्या नद्या व ओढ्यांना पाणी आले आहे. चिंचवणमधील नंदू बडे, केशव रोकडोबा नेटके या शेतकऱ्यांच्या डाळिंबाचे नुकसान झाले आहे. गारपिटीने दुचाकी, चारचाकी वाहनांच्या काचा फुटल्या. चिंचवणमध्ये पडलेल्या गारांच्या पावसामुळे फळभाज्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. दुपारी अवकाळी पावसाबरोबरच चक्रीवादळाने धुमाकूळ घातला. विजेचे पोल आडवे झाल्याने पुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा सुरू होण्यास दोन दिवस लागतील, असे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संागितले. नुकसान झालेल्या भागात पंचनामे सुरू करण्यात आल्याचे मंडल अधिकारी डी.एल.भडके यांनी सांगितले.

टरबूज, खरबुजाचे नुकसान
केज तालुक्यातील सुर्डी, सोनेसांगवी,माळेगाव परिरसरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे टरबूज, खरबुज, अांबा, डाळिंबाचे नुकसान झाले आहे. धारूर तालुक्यातील अांबेवडगाव, साेनीमाेहा, चाेंडी, थेटेगव्हाण, गावंदरा, प. पारगाव, काठेवाडी, भाेगलवाडी या गावांत गारपीट झाली.

वीज पडून महिला जखमी
वादळी वाऱ्यात विजेचा कडकडाट सुरू असताना घरावर वीज काेसळून महिला जखमी झाल्याची घटना परळी शहरातील शारदानगर भागात रविवारी सायंकाळी घडली. रविवारी शारदानगर भागातील विश्वनाथअप्पा गुदळे यांच्या घरावर वीज पडून छताला छिद्र पडले. त्यांच्याकडे किरायाने राहणाऱ्या जिजाबाई मोरे मोबाइलवर बोलत असतानाच वीज कोसळली. यात माेरे जखमी झाल्या.

लातुरात जोरदार
लातूर शहर व परिसरात रविवारीही अवकाळी पाऊस बरसला. दिवसभर आकाश ढगाळ होते. पारा घसरल्याने व वारे सुटल्याने वातावरणात गारठा वाढला होता. सायंकाळी शहरात पावसाने हजेरी लावली. अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ वादळी पाऊस झाला. वादळाने कैऱ्या पडत असून गुऱ्हाळे थंडावली आहेत. लातूर तालुक्यातील पिंपळगाव आंबा येथे गारा पडल्या. राशीला आलेल्या गव्हाचे नुकसान झाले. हा पाऊस येत्या हंगामासाठी उपद्रवी ठरणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.