आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hailstorm News In Marathi, Droght In Marathwada, Divya Marathi

आसवांचा पाऊस: दैव रुसले, स्वप्न विरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कडवंची (जि. जालना) - दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला. गेल्या वर्षी दुष्काळाने बळीराजाची दैना उडवली. त्यानंतर ब-यापैकी झालेल्या पावसाने शेतक-यांत समाधान होते. यंदा रब्बी हात देणार, यावर बळीराजा खुश होता. अनेकांनी स्वप्ने रंगवली होती. रब्बीचे पीक काढणीला तयार होते. अनेक ठिकाणी खळ्याची तयारी झाली होती. मार्चच्या दुस-या आठवड्यात आलेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने सर्व काही होत्याचे नव्हते करून टाकले. हातातोंडाशी आलेला घास असा दैवाने हिरावून नेल्याच्या धक्क्याने मराठवाड्यातील शेतक-यांनी आत्महत्या केल्या. आधीच दुष्काळाने पिचलेल्या शेतक-याचे सारे आर्थिक गणित गारपिटीने बिघडवून टाकले. आता यातून दोन वर्षे तरी शेतक-याला उभारी येणार नाही. अनेकांचे स्वप्न यामुळे भंगले.


कडवंची. जालना जिल्ह्यातील बागायतदारांचे गाव. सुमारे 350 एकरावर द्राक्षबागा गावात आहेत. गारपीट आणि अवकाळी पावसाने द्राक्ष बागांची दैना केली. सतत आठवडाभर पडणा-या पावसाने जास्त नुकसान केले. गावची लोकसंख्या 4000 च्या आसपास. द्राक्ष बागांवर गावचे आर्थिक गणित अवलंबून. वर्षाकाठी 20 ते 25 कोटींची उलाढाल द्राक्षांच्या व्यापारातून येथे होते. यंदा उलाढाल 10 कोटींच्या आत होणार आहे. सोनका, तास ए गणेश जातीच्या येथील गोड द्राक्षांना राज्यभरातून मागणी असते. चंद्रपूरपासून ते बुलडाण्यापर्यंतचे व्यापारी येथे द्राक्ष खरेदीसाठी येतात. यंदा मात्र पावसाने या द्राक्षांची गोडी कमी झाली. चंद्रकांत क्षीरसागर, उत्तमराव क्षीरसागर, भगवानअप्पा क्षीरसागर, विष्णू बापू क्षीरसागर, रमेश क्षीरसागर असे अनेक बागायतदार गावात आहेत. कोणाची पाच एकर, तर कोणाची दोन एकर द्राक्ष बाग आहे. पावसाने सर्वांच्या द्राक्ष बागांना फटका बसला आहे. चंद्रकांत शिवाजी क्षीरसागर यांची पाच एकरांवर द्राक्ष बाग आहे. गारांचा मारा सर्वच द्राक्षांना बसला. अनेक घड गळून पडले, द्राक्षमण्यांचा सडाच बागेत पडला. या बागेतून दहा लाखांचे होणारे उत्पन्न गारपीट व पावसाने हिरावून नेले.


स्वप्नांची राखरांगोळी
चंद्रकांत क्षीरसागर यांची द्राक्षांची दहा लाखांची बाग उद्ध्वस्त तर झालीच, शिवाय त्यांच्या पाच एकरांवरील डाळिंबाच्या बागेलाही गारपिटीचा फटका बसला. यंदाच्या नफ्यातून बोलेरो गाडी खरेदी करण्याचे त्यांचे स्वप्न दैव रुसल्याने गारपिटीतच विरले. कडवंचीतील उत्तमराव क्षीरसागर, तर रमेश क्षीरसागर यांच्या द्राक्ष तसेच डाळिंब बागेला असाच फटका बसला. त्यांनी यंदा द्राक्षबाग वाढीचे नियोजन होते, घरगुती वस्तू खरेदी करायच्या होत्या, ते सारेच आता विरले आहे.


सरकार अजून झोपेतच
अंबाजोगाई तालुक्यातील गारपीटग्रस्त मांडवा पठाण या गावातील महादेव शेळके या तरुण शेतक-याने आत्महत्या केली. हे गाव अंबाजोगाईपासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर आहे. आत्महत्या होऊन सात-आठ दिवस झाले. अद्याप एकही सरकारी अधिकारी, कर्मचारी या कुटुंबाच्या सांत्वनासाठी फिरकलेला नाही. अशीच स्थिती सर्वत्र पंचनाम्यांची आहे. अनेक गावांत पंचनामे झालेले नाहीत, जेथे झाले तेथे काहींनी तालुक्याच्या ठिकाणी बसून, तर काहींनी बांधावरूनच पंचनामे केल्याचे मांडवा पठाणचे सरपंच शाहू बिडवे यांनी सांगितले.


अवकाळीने अवकळा
गारपीट, वादळी वारे आणि अवकाळीमुळे राज्यात 18.69 लाख हेक्टरवरील उभ्या पिकांना फटका बसला आहे. मराठवाड्यात केशर आंबा मोठ्या प्रमाणात आहे. गारपिटीमुळे एक हेक्टर केशर आंबा बागेमागे अडीच लाख रुपयांचे नुकसान होते. औरंगाबाद, जालना जिल्ह्यात केशर आंब्याबरोबरच मोसंबी मोठ्या प्रमाणात आहे. मोसंबीच्या बागांना आधी दुष्काळामुळे आणि आता गारपिटीने झोडपल्याने या बागायतदारांना दुहेरी फटका बसला आहे. उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड जिल्ह्यात द्राक्षे, डाळिंब, केळी, मोसंबी, लिंबू, आंबा आदी फळबागा गारपिटीने उद्ध्वस्त झाल्या आहेत.


आर्थिक फटका आणि भरपाई
हिमायतबाग फळ संशोधन केंद्रातील कृषी शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी फळबागांचे आर्थिक गणित मांडले. त्यांच्या मते, एक हेक्टर मोसंबी बागेतून साधारण दोन ते 10 टन उत्पादन मिळते. उत्पादन खर्च वजा जाता त्या बागायतदाराला एक लाख रुपये नफा मिळतो. डाळिंबाच्या बाबतीतही हस्त बहाराची डाळिंबे सध्या विक्रीसाठी तयार होती, मात्र अवकाळी पावसाने डाळिंब बागायतदाराला हेक्टरी मिळणारा दीड लाख रुपयांचा नफा मातीमोल झाला. तज्ज्ञांनी मांडलेले गणित आणि सरकारी मदत यांच्यात कोठेच मेळ नाही. सरकारी मदत तुटपुंजी ठरणार आहे.