आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hailstorm Suffered Farmers News In Marathi, Unseasonal Rain, Maharashtra

शेतक-यांच्या हृदय पिळवटून टाकणा-या व्यथा; आसवांचा पाऊस, हुंदक्यांच्या गारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कडवंची (जि.जालना) - खरिपात पाऊस चांगला झाला होता. त्यामुळे रब्बीवर शेतक-यांना चांगली आशा होती. मात्र ऐन वैशाखात गारपीट आणि अवकाळी पावसाने तडाखा दिला. शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. कर्ज काढून रब्बी पिकवणा-या बळीराजाला दैवाने असे मारले. अनेकांनी आत्महत्या केल्या. काही दिवसांपूर्वी वा-याच्या झोकात डोलणारे शिवार सुन्न झाले. अवकाळी पावसानंतर सुरू झाला आसवांचा पाऊस. कोणाचा घरधनी गेला, कोणाचा भाऊ गेला, खळे सारवून-पुसून बसलेल्या बळीराजाच्या कुटुंबांच्या वाट्याला हुंदक्यांच्या गारा आल्या...
‘या, हे बघा. सगळी द्राक्षं खराब झालीत. त्याची कदर देखंना आमच्यानं म्हणून काढून टाकणं सुरुय. आमच्या लक्ष्म्या हातानं एक एक दाणा गोळा करतायत. लई नुस्कान झालं. पंक्तीला बलावलं अन् भरल्या ताटावरून हाकलून द्यावं तसं झालंय बघा....’ कडवंचीच्या चंद्रकांत क्षीरसागरनं द्राक्षाच्या मांडवात बसकण मारत सडलेले घड दाखवायला सुरुवात केली. गारपीट. निसर्गाचा एक सडाका असा काही पडला की त्यानं पोटावरच घाव घातला. 10 लाखांचं उत्पन्न घरात येणार होतं. आता त्याच्या 25 टक्के पण हाती लागणार नाही हे त्याला कळून चुकलंय. पण त्याची जिगर कायम आहे. शेवटी त्यानं ‘ एका झटक्यात दोन वर्षं मागे गेलो हे खरंय. पण बचेंगे तो और भी लडेंगे ना’ असं सांगत जिगर दाखवून दिली.


जालना ते सिंदखेडराजा रस्त्यावर 20 किमी गेल्यावर डाव्या हाताला एका बारक्याशा रस्त्यानं तीन किमी आत गेलं की कडवंची गाव येतं. मुख्य रस्त्यापासून आत शिरतानाच दोन्ही बाजूला शेततळी दिसतात. द्राक्षाच्या बागा, कुठं अजून घड लगडले आहेत. काही ठिकाणी शेतक-यांनी सगळं साफ करून टाकलंय तर काही ठिकाणी कामे सुरू आहेत. हे चित्र संपेपर्यंत कडवंची येतं. गावात शाळेच्या समोरच्या भागात पाच सहा पुरुष मंडळी बसलेली. गप्पांचा विषय तोच. गारपीट, नुकसान, सरकारची मदत आणि पुढं काय? किती नुकसान झालं ते दाखवायला चंद्रकांत त्यांच्या शेतात घेऊन गेले. पाच एकरांची द्राक्षाची हिरवीगार बाग बाहेरून पाहताना इथं दहा - पंधरा दिवसांपूर्वी निसर्गाचं काही तांडव झालं असेल असं वाटतच नव्हतं. चंद्रकांतच्या मागोमाग बागेत प्रवेश केला आणि पायाखाली टचकन द्राक्षं फुटायला लागली. एका झाडाशी बसकण मारत त्यानं हातानं द्राक्षं बाजूला सारून जागा केली. लगडलेल्या घोसातील चिमलेल्या, काळ्या पडत चाललेल्या द्राक्षाकडं बोट दाखवत सांगायला सुरुवात केली.
चंद्रकांतच्या 5 एकरावर डाळिंबाची 1100 झाडे आहेत. त्याचा बहार सगळा गेला. शिवाय 3 एकरावरचा गहू आडवा झाला, तशीच शाळू ज्वारीही खराब झाली. कांदा सीडही खराब झालं.


उभ्या पिकांबरोबरच शेतक-यांच्या कुटुंबांची स्वप्नेही उद्ध्वस्त
एकरी पाच हजार रुपये मदतीने काय उजळते ?
चांगलं 10 लाखांचं उत्पन्न होईल असं वाटत होतं. एक बोलेरो घ्यायची होती या बारीला. पण आता सगळं बिघडलं. नुकसानच 7 लाखांचं झालंय माझं. सरकार मदत देणार आहे. पंचनामे बी झाले. एकरी पाच हजार रुपये मिळतील. त्यानं काय होतंय हो? चंद्रकातने उपस्थित केलेला सवाल मराठवाडा आणि विदर्भातील प्रत्येक गारपीटग्रस्त शेतक-यांच्याही मनात आहे.


‘पंक्तीला बलावलं अन् भरल्या ताटावरून हाकललं’
वेलीवरचा खराब होत चाललेला घड हातात घेत चंद्रकांत म्हणाला, हे असे सगळे हाल झाले. बागेत सगळे मणी पडले. जे झाडावर राहिले तेबी आता खराब झाले. 35 रुपये भाव आल्ता साहेब, 35 रुपये. एक ट्रिप गेलीबी होती. मेहकरच्या व्यापा-यानं नेली. पुढच्या जाणार तर हे सगळं झालं. पंगतीला बलावून भरल्या ताटावरून उठवल्यासारखं झालं बघा.


आधी दुष्काळाचा मार, आता...
चंद्रकांत सांगू लागला, ‘आमच्या गावात 350 एकरवर द्राक्षबागा आहेत. आणखी 300 एकरवर नवीन लागवड झाली आहे. 325 शेततळी केल्यानं आमचा पाण्याचा प्रश्न फारसा गंभीर नाही. मागल्या वर्षी दुष्काळात जालना जिल्ह्यात फक्त 198 मिलिमीटर पाऊस पडला. पण आमच्या गावचं एक बी जनावर छावणीत नव्हतं. यंदा 515 मिलिमीटर पाऊस पडला. उत्पादन चांगलं येणार वाटत असताना या गारपिटीनं रट्टा हाणला बघा.’


घशाला कोरड अन् पोटात खड्डा
गारपिटीची माहिती देताना चंद्रकांत म्हणाला, ‘26 तारखेपासून गावात सलग 15 दिवस पाऊस झाला. दोन दिवस गारा पडल्या. दिवसभर काही नसायचं. पण रात्री पाऊस यायचा. एका रात्री गारा पडायला सुरू झाल्या. मोठाल्या गारा. पाहता पाहता ढिगारा झाला. मी बघत होतो. बागा डोळ्यासमोर होत्या. घशाला कोरड पडली. पोटात खड्डा पडला. तांब्याभर पाणी प्यायलो आणि पाहत राहिलो.’


14 शास्त्रांचा स्वामी 15 व्या शास्त्रासमोर हतबल
प्रत्येक शेतक-याला 14 शास्त्रांचे ज्ञान असते. हवामानशास्त्र, कृषिविज्ञान शास्त्र, कीटकशास्त्र, पीकरोग निदानशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मृदाविज्ञान, पशुवैद्यकीयशास्त्र, फलोत्पादन, कृषी अभियांत्रिकी, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, बीजशास्त्र यासारख्या 14 शाखांचे ज्ञान त्याला उपजतच असते. या सर्व शास्त्रांत पारंगत असलेला हा बळीराजा शासन व्यवस्था शास्त्रापुढे मात्र भिकारी असल्याचे नेहमीच दिसून येते. सरकारी नियम आणि लालफितीच्या कारभाराचा बोध त्याला होत नाही. मग तुटपुंजी मदत आणि नियमांचे झेंडे त्याला सतावतात. त्याच्या पदरी काहीच पडत नाही. आताची मदतही निकषांच्या जंजाळातून त्याला काही देईल याचा नेम नाही.