आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसतिगृहातील मुलींचा कर्मचा-याकडून छळ, निलंबनाची कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरगा - येथील वसतिगृहातील मुलींचा छळ होत असल्याची आणि महिला गृहपालाने खोट्या नोंदी दाखवून साडेतेरा लाख रुपयांच्या अपहाराची दुहेरी घटना उजेडात आली आहे. महिला गृहपालाने अपहार लपवण्यासाठी आपला वरिष्ठांकडून छळ होत असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार महिला आयोगाच्या सदस्यांनी शुक्रवारी वसतिगृहास भेट दिली, परंतु महिला गृहपाल वसतिगृहात वास्तव्याला नसून याचा गैरफायदा घेत एका चतुर्थश्रेणी पुरुष कर्मचा-याने मानसिक छळ केल्याची तक्रार या वेळी वसतिगृहातील मुलींनी केली. यावरून या कर्मचा-याला निलंबित करण्यात आले.

एसटी कॉलनीत खासगी इमारतीमध्ये ८० मुलींची प्रवेश क्षमता असणारे शासकीय वसतिगृह आहे. येथे ४० मुली राहतात. मात्र, येथील गृहपालांनी वसतिगृहात राहत नसलेल्या २० मुलींच्या नावाच्या खोट्या नोंदी करून १३ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केला असल्याचे समोर आले आहे. वसतिगृहातील महिला गृहपाल के. व्ही. वाघमारे यांच्यावर अपहाराचा ठपका आहे. त्यांनीच विद्यार्थ्यांच्या खोट्या नोंदी दाखवून हा अपहार केल्याची माहिती चौकशीत समोर आले आहे. परंतु अापल्यावरील आरोप दाबण्यासाठी गृहपालाने महिला आयोगाकडे वरिष्ठांकडून छळवणूक होत असल्याची तक्रार केली होती. याची सुनावणी बुधवारी (दि.१५) पुणे येथे पार पडली. परंतु यात काही निष्पन्न झाले नाही. या गृहपालाकडे तुळजापूर आणि उमरगा येथील मुलींच्या वसतिगृहाचा पदभार आहे. परंतु दोन्ही ठिकाणी त्या मुख्यालयी राहत नव्हत्या. याबाबत "दिव्य मराठी'ने यापूर्वी प्रकाश टाकला होता. कार्यालयप्रमुख उपस्थित राहत नसल्याने वसतिगृहातील चतुर्थश्रेणी कर्मचा-याने मुलींचा छळ केल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे. दरम्यान, या गृहपालाने ज्या मुलींची नावे नोंद केली होती, त्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात व शाळेत जाऊन भेटल्यास त्यांनी वसतिगृहात राहत नसल्याचे सांगितले आहे. हा अपहार केवळ एक वर्षातील तपासणीतून समोर आला आहे.

गृहपालांची पदे भरावीत
शासनाने मुलींच्या वसतिगृहातील गृहपालांची रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत, जेणेकरून महिला गृहपाल उपस्थित असल्यास तेथे होणारे मुलींवरील लैंगिक अत्याचार थांबतील व मुलींना संरक्षण मिळेल, असे महिला आयोगाच्या सदस्या उषाताई कांबळे म्हणाल्या.