आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आ. जाधवांची कन्नडला तिसऱ्या आघाडीची तयारी, शिवसेना पदाधिकाऱ्यांवर रोष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - शहरात नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असूनही याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत दुर्लक्ष केले आहे. यामुळे या निवडणुकीसाठी “विकासमहर्षी स्व. रायभानजी जाधव आघाडी’ करत असल्याची घोषणा आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शुक्रवारी (दि. ८) शहरातील शिवसेना कार्यालयात केली.
नगरपालिकेच्या निवडणूकसंदर्भात प्रभागरचना, सदस्यपदाचे आरक्षण आदी बैठकप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांनी या महत्त्वाच्या वेळी बैठक घेतली नाही, असे सांगून त्यांनी पत्रपरिषदेत शिवसेना पदाधिकाऱ्यांवर टीका केली. या वेळी ते म्हणाले, कन्नड शहरात बरेच होतकरू तरुण पालिकेची निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीचे आरक्षण झाले असून इतर राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची बैठक घेण्यात आली. मात्र यात शिवसेना पक्षाची राजकीय मोर्चेबांधणी कोठेही होताना दिसत नाही. शहरातील नागरिकांचा शिवसेनेकडे कौल आहे, परंतु शिवसेना उमेदवारांना हातावर हात ठेवावे लागत आहेत. नगरपालिका निवडणुकीसंदर्भात प्रभागरचना होताना शिवसेना पदाधिकारी शांत बसले. सदस्यपद आरक्षणाच्या वेळी जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी दुबईला होते. यात स्थानिक व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याची टीका त्यांनी या वेळी केली. यावर तोडगा म्हणून सर्वसामान्य उत्सुक नागरिकांना राजकीय कारकीर्दीची सुरुवात करता यावी म्हणून नगरपालिका निवडणूक २०१६ साठी विकासमहर्षी स्व. रायभानजी जाधव आघाडी करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांना पूर्वतयारी करण्याकरिता वाव देण्यात येणार असून शिवसैनिकांना संधी देण्यात येणार आहे. यानिमित्त १५ जुलैला शहरातील जैन कॉम्प्लेक्स येथे मेळावा होणार आहे.

भूमिका १५ जुलैलाच होईल स्पष्ट
एकूणच नगरपालिका निवडणुकीस अजून ६ महिने अवकाश असून आतापासूनच शहरातील वातावरण तापायला लागले आहे. प्रभागरचनेतून नाराज झालेले शिवसैनिक इतर मार्गांचा शोध घेताना दिसत आहेत. शिवसेनेचे वलय असलेल्या इच्छुकांना दुसऱ्या मतांकडे आपला मोर्चा वळवावा लागेल हे उघड आहे. आमदार जाधव यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना पक्षात गोंधळाची स्थिती असून यात शिवसैनिक कोणती भूमिका घेतात हे १५ जुलैलाच स्पष्ट होईल.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...