आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपंगत्वावर मात करून जिद्दीने मिळवली सचिनने नोकरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - जेव्हा हिंडण्याफिरण्याचे व शाळेचे दिवस आले तेव्हा आईच्या कडेवर अन् महाविद्यालयात जाताना तीनचाकी रिक्षाचा आधार घ्यावा लागला. तरीही हिंमत न हारता गावात दहावीपर्यंत शिक्षण, त्यानंतर बेटावद-नरडाणा (जि. धुळे) येथे महाविद्यालयीन शिक्षण. अमळनेर (जि. जळगाव) येथे एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेऊन दोन्ही पायांनी अपंग असताना जिद्दीच्या बळावर फोरेन्सिक विभागात नोकरी मिळवणाऱ्या सचिन देविदास चौधरी (३४, रा. मुडावद, ता. सिंदखेडा, जि. धुळे) या तरुणाची शिक्षणाची धडपड बघून मित्रही त्याला स्ट्रगलमॅन म्हणायचे. अशा या स्ट्रगलमॅनने ३ डिसेंबर २०१६, जागतिक अपंगदिनी अपंग सहचारिणी निवडून धडधाकट तरुणांच्या डोळ्यांत अंजन घातले आहे.

जन्मानंतर दीड वर्षाचा असताना ताप आला अन् पोलिओने दोन्ही पाय गेले. त्यानंतर कुटुंबीयांनी खूप इलाज केले, पण यश आले नाही. त्यामुळे सचिनही खचला होता. शालेय शिक्षण गावातच सुरू होते. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेताना अनंत अडचणी यायच्या. कधी कधी वाटायचे, नको ते शिक्षण, नैराश्य यायचे. दोन हजार इसवी सनमध्ये पुण्यातील अपंग प्रशिक्षण केंद्रात आयटीआयचे प्रशिक्षण घेतले. त्यादरम्यान शिक्षकांनी स्वावलंबनाचे महत्त्व सांगितले अन् तेव्हापासूनच ठरवले की, कुणाचीही कुबडी न घेताना स्वत:च्या पायांवर उभे राहायचे. म्हणून गावात एसटीडी बूथ सुरू केला. याबरोबरच एलआयसी एजंट म्हणून काम केले. जळगावला स्पर्धा परीक्षेची तयारी केली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेतून २०१३ मध्ये फोरेन्सिक लॅब, पुणे येथे मुलाखतीसाठी निवड झाली. इंटरव्ह्यू पॅनलने विचारले, तुम्ही दोन्ही पायांनी अपंग आहात, नोकरी कशी करणार? यावर शरीराने अपंग असलो तरी मनाने नाही, शिक्षण घेताना अडचणींवर कशी मात केली, एलआयसी एजंट म्हणून फिरून काम केले असल्यामुळे उत्कृष्ट एजंट म्हणून गौरवले असल्याचे सांगितले. गोंदिया येथे पॅरालिम्पिक राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत दुसरा आल्याचे सांगितले. हा सर्व अनुभव व जिद्द तेथे कामाला आली अन् फोरेन्सिक विभागात निवड झाली. नोकरी सुरू होती, कुटुंबीय लग्नासाठी आग्रह धरत होते. मात्र, पायाने अपंग असलेल्या व राज्य सेवेत असलेल्या मित्राने सांगितलेला अनुभव आठवायचा. मित्र वर्ग दोनचा अधिकारी होता. अपंग असला तरी चांगले स्थळ चालून आले अन् त्याने लग्न केले.

नोकरीनिमित्त दररोज ६० किमी प्रवास
सचिन चौधरी यांचे कार्यालय चतु:शृंगी, पुणे येथे आहे, तर ते देहू रोड येथे राहतात. हे अंतर ३० किमी आहे. मॉडिफाइड केलेल्या मोटारसायकलने सचिन चौधरी दररोज साठ किलोमीटर प्रवास करतात. कधीही, कुठेही तक्रार करत नाहीत हे धडधाकट असलेल्या माणसाला लाजवणारे आहे.
बातम्या आणखी आहेत...