आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य : धारूर तालुक्यात पोलिओचा रुग्ण!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - कान्हापूर (ता. किल्लेधारूर) येथील दहा महिन्यांच्या बाळाला पोलिओची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या शौच तपासणीत व्हीडीपीव्ही टाइप-2 ची बाधा झाल्याचे आढळले असून हे विषाणू दुर्मिळ परिस्थितीत जोखीमग्रस्त भागात व बालकामध्ये क्वचित प्रमाणात आढळतात. दरम्यान, दिल्लीतील आरोग्य पथक शुक्रवारी धारूर तालुक्यात धडकणार असल्यामुळे आरोग्य यंत्रणेची भंबेरी उडाली आहे. पोलिओ संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर त्या परिसरात पाच किलोमीटर अंतरात लसीकरण मोहीम राबवण्यात येते. सन 2013 मध्ये आतापर्यंत 16 पोलिओ संशयित बालके आढळून आलेली असतानाच कान्हापूर गावात पोलिओचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे.


कान्हापूर येथील बालकास 4 मे रोजी लुळेपणा आला होता. त्याला अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 13 व 15 मे रोजी या बालकाचे शौच नमुने तपासणीसाठी मुंबईतील प्रयोगशाळेत पाठवले. पोलिओ झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुषंगाने धारूर तालुक्यात कृती योजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याअंतर्गत तालुक्यात आढावा सभा घेण्यात येणार आहे.