आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपात्र सदस्यांची पंकजा मुंडे यांच्यासमोर सुनावणी नको; राष्ट्रवादी करणार मुख्यमंत्र्यांकडे मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- बीड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या वेळी भाजपला मदत करणाऱ्या धस व क्षीरसागर गटाच्या एकूण सहा जिल्हा परिषद सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवल्याने भर दिवाळीत भाजप अल्पमतात आल्याने खळबळ उडाली आहे. नवीन शासन आदेशानुसार सदस्य अपात्र प्रकरणी  अंतिम सुनावणीचे अधिकार ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना असले तरी ही सुनावणी त्यांच्याकडे दिली जाऊ नये, अशी मागणी बीडची राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. आता  केवळ २५ संख्याबळ उरल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपवर अविश्वासाचा ठराव दाखल करता येणार नाही.    

माजी मंत्री सुरेश धस यांच्या गटाच्या पाच सदस्यांनी जिल्हा परिषदेत सत्ता  स्थापनेच्या वेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या  भाजप गटाला मदत केली होती, तर  आमदार क्षीरसागर यांच्या गटाच्या  एका सदस्याने आजारपणाचे कारण पुढे करून बहुमताकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे  जिल्हा परिषदेत पुरेसे संख्याबळ असूनही  माजी मंत्री सुरेश धस यांच्या अचानकच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीला  सत्तेपासून  दूर राहावे लागले होते. यानंतर माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत माजी मंत्री  धस यांच्यावर आरोप करून त्यांच्या  निलंबनाची मागणी  पक्षाकडे केल्यानंतर धस यांच्यावर पक्षाने कारवाई केली.   त्या पाच  सदस्यांना अपात्र करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री धस गटाचे पाच व क्षीरसागर गटाचा एक अशा सहा सदस्यांना  अपात्र ठरवले. अपात्र सदस्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे या निर्णयाविरुद्ध अपील करू शकतात, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने अशा प्रकारच्या अपिलाला विरोध केला.

असे आहे पक्षीय बलाबल    
बीड जि.प.मध्ये एकूण सदस्य संख्या ६० असून राष्ट्रवादीकडे २५, काँग्रेस ३, काकू नाना आघाडी ३ ,भाजपकडे १९,  शिवसंग्राम ४,शिवसेना ४, गोपीनाथ मुंडे आघाडी भाजप पुरस्कृत १, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल असून भाजपने शिवसंग्राम, शिवसेना प्रत्येकी चार, काँग्रेसचा एक व राष्ट्रवादीचे धस गटाचे पाच अशा ३३ सदस्यांच्या मदतीने  सत्ता आणली.  भाजपला मदत करणारे धस गटाचे पाच सदस्य अपात्र ठरल्याने भाजपचे संख्याबळ २८ , तर राष्ट्रवादीकडे २० सदस्यांसह काकू नाना विकास आघाडी ३ व काँग्रेस २ असे २५ संख्याबळ आहे. 

अविश्वास ठराव दाखल करणार नाही     
बीड जिल्हा परिषद  भाजपच्या ताब्यात येऊन दहा महिने होत आले तरी जिल्ह्यातील मतदार संघात एक रुपयाचा निधी आलेला नाही. त्यामुळे विकासाची कामेही झालेली नाहीत. अविश्वास ठरावासाठी ३५ सदस्यांची गरज असते म्हणून आम्ही भाजपवर अविश्वासाचा ठराव दाखल करणार नाहीत.  त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने  चांगलाच धडा बसला आहे.   बजरंग सोनवणे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी 
बातम्या आणखी आहेत...