आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खटकाळी ओसंडली; बिंदुसरेला पूर, बार्शी नाक्यावरील पूल वाहून गेला; महामार्गाचा संपर्क तुटला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- बीड तालुक्यातील  नेकनूर, मांजरसुंबा महसुली मंडळात झालेल्या जोरदार पावसाने खटकाळी नदी ओसंडून वाहिली. तिचे पाणी  थेट बिंदुसरा  नदीत आल्याने पुराच्या पाण्यात रविवारी रात्री बीड शहरातील बार्शी नाक्यावरील पर्यायी पूल  एेन मधोमध तुटून  वाहून गेला. यामुळे बीड शहरातून  जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा संपर्क तुटला.  रात्री दोन तासांतच  बीड शहर वाहतूक पोलिसांनी तळ ठोकून बीडहून लातूर, उस्मानाबाद, सोलापूरकडे जाणारी वाहने बीड, नायगाव, रोहतवाडी, पाटोदा मार्गे मांजरसुंब्याकडे तर मांजरसुंब्याहून औरंगाबाद , धुळे, जालन्याकडे जाणारी वाहतूक बार्शी नाका, तेलगाव रोड , नाळवंडी नाका, खंडेश्वरी, जुना मोंढा, मसरतनगरमार्गे जालना रोडकडे वळवण्यात आली.  

बीड शहरातील बार्शी नाक्यावरील बिंदुसरा नदीवरील  जुना कमकुवत पूल  मागील वर्षीच  रहदारीसाठी  यापूर्वीच बंद ठेवण्यात आला आहे.  आयआरबीने दीड कोटी रुपये खर्च करून  बिंदुसरा  नदीच्या पात्रात  मागील उन्हाळ्यात पर्यायी पूल व मार्ग केला. परंतु  दोन महिन्यांपूर्वीच अवकाळी  पावसामुळे  नदीला आलेल्या पाण्याने  पूल खचला होता. त्यानंतर आयआरबी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हा पूल दुरुस्त केला होता. परंतु रविवारी रात्री खटकाळी नदीतील पाणी  थेट बिंदुसरेत आल्याने   बिंदुसरा पूर्ण क्षमतेने वाहू लागली. या पुराच्या पाण्यातच बार्शी नाक्याजवळील बिंदुसरा नदीवरील पर्यायी मार्ग व पूल वाहून गेला. रात्री बीड शहरातील मोंढा मार्ग, नगर रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी सकाळी  बिंदुसरा नदीतील पाणीपातळी कमी होताच पूल ऐन मध्यभागी तुटला. पुराच्या पाण्यात सिमेंट, वाळू व मोठमोठे दगडही वाहून गेले. 

बीड जिल्ह्यातील ५ महसूल मंडळांत दमदार बरसला   
सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मागील २४ तासांत २१.१० मिमी पाऊस झाले. मांजरसुंबा, नेकनूर मंडळ (ता.बीड), थेरला, अंमळनेर (पाटोदा), धामणगाव (आष्टी) या पाच मंडळांत जोरदार पाऊस बरसला. जिल्हाभरात रविवारी सकाळपासून ठिकठिकाणी पाऊस सुरू होता. दिवसभरात पाटोदा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ५२ मिमी इतका पाऊस झाला. आष्टी ३२.२९, बीड २३.४५,  केज २६.७१,अंबाजोगाई २६.६० ,वडवणी २४ ,परळी १६.४०, शिरूर ७.६७, धारूर ८.३३ आणि गेवराई तालुक्यात ६.३० मिमीची नोंद झाली.

हिंगोली, औंढा येथे पाऊस
सोमवारी सायंकाळी जिल्हाभरात  सर्वदूर  पाऊस झाला. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होत असून १९-२० ऑगस्टच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर या दोन्ही दिवशी मध्यम मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता.   त्यानंतर दोन दिवस रिमझिम पाऊस झाला. गेल्या आठ दिवसांपासून दररोज पाऊस होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाभरात सर्वदूर मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. आज सायंकाळनंतर हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी या तिन्ही तालुक्यांत जोरदार पाऊस झाला.  

सेलूत वीज पडून ६ जण जखमी
तालुक्यातील राजा गावाजवळील शेतात वीज पडून सहा जण होरपळल्याची घटना सोमवारी (२८) दुपारी २.४५ वाजता  वाजता घडली.   राजा गावाजवळील ब्राह्मणगाव शिवारातील अभिमान दवंडे यांच्या शेतात मूग तोडणीचे काम सुरू होते. मजूर शेतातील खोपीमध्ये जेवणासाठी बसले असता दुपारी अडीच वाजता पाऊस सुरू होऊन  २.४५  च्या सुमारास खोपीवर वीज पडली. याात  सुधाकर  हिवाळे, शेतमालक अभिमान  दवंडे, राधाबाई दवंडे, आयेशा पठाण, पूजा  हिवाळे, कुशावर्ता  पितळे  होरपळले.  सुधाकर हिवाळे गंभीररीत्या भाजले.   जखमींना परभणीला हलवण्यात आले .
बातम्या आणखी आहेत...