आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला-परळी रेल्वे तीन तास खोळंबली,पांगरा शिंदे भागातील रेल्वेमार्ग नादुरुस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगाेली- बुधवारी दुपारी ते रात्री या वेळेत कळमनुरी तालुक्यातील बोल्डा आणि वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पांगरा रेल्वेस्थानकाजवळील रेल्वे रुळाखालील गिट्टी वाहून गेली. यामुळे अडीच तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली. परिणामी अकोला-परळी रेल्वेगाडी बोल्डा स्थानकावर अडकून पडली.

नांदापूर मंडळात येणाऱ्या बोल्डा, सिंदगी, वापटी, कुपटी आदी भागांसह वसमत तालुक्यात येणाऱ्या पांगरा शिंदे मंडळातील पांगरा, खांबाळा, खापरखेडा आदी भागांत बुधवारी सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. या भागातील पेरलेल्या जमिनी खरडून गेल्या, तर पांगरा, बोल्डा भागातून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आल्याने बोल्डा, बोल्डावाडी गावातही पाणी शिरले. याशिवाय पांगरा स्थानकाजवळील रुळाखालील गिट्टी पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने अकोला-पूर्णा रेल्वेमार्ग साडेतीन तास बंद होता. अकोल्याहून परळीला जाणारी पॅसेंजर रेल्वेगाडी सव्वापाच वाजता बोल्डा येथून पुढे जाणे अपेक्षित होते. परंतु मार्गात बिघाड झाल्याने ही गाडी रात्री पावणेआठ वाजता बोल्डा स्थानकातून पुढे निघाली. तत्पूर्वी रेल्वे विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रेल्वेमार्ग दुरुस्त करून मार्ग मोकळा केला. कळमनुरी आणि वसमत तालुक्याशिवाय हिंगोली आणि सेनगाव तालुक्यातही जोरदार पाऊस झाला.

अर्धापूर,भोकरसह तालुक्यांत मुसळधार
जिल्ह्यात बुधवारी मान्सून चांगलाच सक्रिय झाला. अर्धापूर तालुक्यात दुपारी साडेतीनच्या सुमाराला मुसळधार पावसाने हजेरी लावली. नांदेड-नागपूर महामार्गावरील डोंगरकडा गावाजवळ पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. भोकर तालुक्यातही मुसळधार पावसाने वाहतूक विस्कळीत केली.

अर्धापूर तालुक्यात दुपारी साडेतीन ते पाच वाजता जोरदार पाऊस झाला. अर्धापूर, वारंगा, हदगाव या पट्ट्यात पावसाने चांगलाच जोर धरला. डोंगरकडाजवळ मुसळधार पावसाने महामार्गावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. रस्त्यावर जवळपास दीड-दोन फूट पाणी वाहू लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अर्धापूर तालुक्यात नाले, ओढे यांनाही पूर आल्याने आसना नदीही दुथडी भरून वाहत आहे. जिल्ह्याच्या माहूर, किनवट, भोकर, कंधार, उमरी, देगलूर या तालुक्यांतही पावसाने दमदार हजेरी लावली. भोकर तालुक्यात दीड तासात ६० मिमी पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे भोकर-तामसा मार्गावरील सुधा नदीला पूर आला. बोरगावजवळ पुराचे पाणी पुलावरून वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दुपारी चार वाजेपासून दीड तास बंद होती.

जालनाजिल्ह्यात पावसाची हजेरी
शहरासह जिल्ह्यात बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून कमी-अधिक सर्वत्र पाऊस पडल्यामुळे ठिकठिकाणी शेतात पाणी साचले आहे. धरणे, प्रकल्पांची पाणीपातळीही वाढली. जालना शहरासह परिसरात बुधवारी वाजेला जोरदार पावसाला सुरुवात झाली. परतूर, मंठा तालुक्यांतही दमदार पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातील आन्वा पाडा, वाडी बु., कठोरा बाजार परिसरात आलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले होते. खोलगट जमीन असलेल्या शेताला पाणी साचल्यामुळे जणू तलावाचे रूप आले होते. वाकडी परिसरात मंगळवारी मध्यरात्रीसुद्धा पाऊस झाला. दरम्यान, दानापूर येथील जुई धरणात फूट पाणी आल्यामुळे भोकरदनसह १९ गावांना दिलासा मिळाला. घनसावंगीसह तालुक्यातील गावांमध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी, धाकलगाव, शहापूर, सुखापुरी आदी गावांमध्येही पावसाने हजेरी लावली.

परभणी,जिंतूर, सेलूमध्ये पाऊस
तीनदिवसांपासून अपेक्षाभंग करणाऱ्या पावसाने बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शहरासह जिंतूर, गंगाखेड आदी तालुक्यांत जोरदार हजेरी लावली. अन्य तालुक्यांतही पावसाची हजेरी लागल्याने हा पाऊस प्रथमच जिल्ह्यात सर्वदूर झाला आहे. अशा स्थितीत हवामान खात्याच्या अंदाजानुसार मंगळवारपासून चांगल्या पावसाची शक्यता वर्तवल्याने तीन दिवसांपासून पेरणीला सुरुवात झाली.

औराद परिसरातील पंचनामे पूर्ण
लातूर- निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात २२ जून रोजी अतिवृष्टी झाली होती. अवघ्या दीड तासात ९४ मिमी पाऊस कोसळला होता. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे जवळपास पूर्ण होत आले आहेत. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा पेरा वाहून गेला, तर नदीकाठच्या जमिनी खरवडून गेल्या होत्या. औराद, सावरी, संगारेड्डी वाडी, चन्नाची वाडी, कोयाची वाडी आदी भागांतील पंचनामे तलाठ्यांनी केले आहेत.

मराठवाडा-विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून मान्सून सक्रिय झाल्याने दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे सीमेवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे.
बातम्या आणखी आहेत...