आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने केली आबादानी, जिल्ह्यात ७७९.७३ मि.मी. पावसाची विक्रमी नोंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - यंदा जूनच्या प्रारंभापासून मेहेरबान झालेल्या पावसाने शेवटच्या टप्प्यात अतिवृष्टीचा दणका दिल्यामुळे जिल्ह्यात ७७९.७३ मि.मी. पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे प्रकल्पात मुबलक पाणी अाले आहे. यात ७ मध्यम प्रकल्पांत ८१.१०, तर ५७ लघु ६७.१४ टक्के असा एकूण ७१.११ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तसेच जलयुक्तचे ३७८ सिमेंट बंधारेसुद्धा फुल्ल झाले आहेत. दरम्यान, दोन-तीन दिवसांच्या उघडिपीनंतर शेतकरी आता रब्बीच्या तयारीला लागले अाहे. मध्यम प्रकल्पांपैकी कल्याण गिरिजा, अप्पर दुधना, जीवरेखा व गल्हाटी १०० टक्के भरून ओव्हरफ्लो झाले, तर कल्याण मध्यम प्रकल्पात ७३, जुईत ४८, तर धामनामध्ये २८ टक्के उपयुक्त साठा झाला अाहे. तर २७ लघु प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा असून उर्वरित ३० प्रकल्पांमध्येसुद्धा मुबलक पाणी आले आहे. शिवाय पूर्णा, धामना, गोदावरी, दुधना, मागणी, गिरजा, जीवरेखा, जुई, केळणा, कुंडलिका, सिना, आनंदी अशा सर्वच नद्या दुथडी भरून वाहिल्या.

तसेच गेल्या दोन वर्षांत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधण्यात आलेले सिमेंट साखळी बंधारे, शिरपूर पॅटर्नचे बंधारे, नाला बांध तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच ज्या-ज्या गाव तलाव किंवा मोठ्या प्रकल्पांमधील गाळ काढण्यात आला, त्यातही मुबलक पाणी साठले आहे. दरम्यान, जोरदार पावसासह अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झालेले आहे. हीच पिके आता कशी-बशी काढून त्या ठिकाणी रब्बी पेरणीसाठी मशागत सुरू आहे.

जलयुक्तचा मोठा आधार
जिल्ह्यात वर्ष १४-१५ व १५-१६ या दोन आर्थिक वर्षांत ३७८ सिमेंट बंधारे बांधण्यात आले होते. तसेच ३० हजार ४७६ हेक्टर क्षेत्रावर कंपार्टमेंट बंडिंगची कामे झाली. २०८ मातीनाला बांध झाले, ४०१ विहिरींचे पुनर्भरण, ४ ठिकाणी केटीवेअरची दुरुस्ती, ४८४ भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या विहिरींचे पुनर्भरण, ३३ गाव व साठवण तलावांची दुरुस्ती, ५९६ नाला सरळीकरण व खोलीकरण, तसेच विविध प्रकल्पांतील ५५.५७ लाख घनमीटर गाळ शासन व लोकसहभागातून काढण्यात आला. यावर जवळपास ८४ कोटींचा खर्च विविध खात्यांमधील स्रोतांतून झालेला आहे.

रब्बी पेरणीची तयारी
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी रब्बीपूर्वी मशागतीच्या कामाला लागले आहेत. तत्पूर्वी मूग, उडीद, बाजरी, सोयाबीन काढणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत, तर काही ठिकाणी बाजरी व सोयाबीन हिरवीच असल्यामुळे काही दिवस काढणीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे पिकांमध्ये तण झाले होते. त्यामुळे शेत पेरणीयाेग्य करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र, जोरदार पावसामुळे येत्या रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई ही पिके जोमात येणार असल्याने शेतकरी कामाला लागले आहेत.
बातम्या आणखी आहेत...