आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जायकवाडी परिसरात दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड परिसरातील गुल्हाटी नदीवर बांधलेला बंधारा शनिवारी झालेल्या पावसाने तुडुंब भरला असल्याने ओसंडून वाहताना पाहावयास मिळत आहे. छाया : सिद्धार्थ वाहुळे. - Divya Marathi
पाचोड परिसरातील गुल्हाटी नदीवर बांधलेला बंधारा शनिवारी झालेल्या पावसाने तुडुंब भरला असल्याने ओसंडून वाहताना पाहावयास मिळत आहे. छाया : सिद्धार्थ वाहुळे.
पैठण - शहरासह जायकवाडी (उत्तर), पिंपळवाडी (पिराची) सह तालुक्यातील अनेक भागांत शनिवारी सायंकाळी परतीचा जोरदार पाऊस झाला. या पावसाने अनेक शेतात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.

सलग दोन दिवसांपासून पाऊस होत असल्याने शेतकरी वर्ग समाधानी झाला आहे. खरिपाच्या पिकांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. तसेच हा परतीचा पाऊस रब्बीच्या पिकांसाठी चांगला लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी असल्याचे दिसते. सलगच्या पावसामुळे नदी-नाल्यांनाही पाणी आले आहे.

परभणीत मुसळधार
पावसाच्या प्रतीक्षेत बैलपोळा साजरा करणाऱ्या बळीराजाला पावसाने जोरदार सलामी दिली. परभणी शहरासह गंगाखेड तालुक्यात शनिवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारास एक तास मुसळधार पाऊस झाला. दोन दिवसांपूर्वी सलग दोन दिवसांच्या जोरदार पावसानंतर उघडीप दिली होती.

जुलै महिना कोरडा गेल्यानंतर ऑगस्टमध्ये सुरुवातीस आगमन करणाऱ्या पावसाने ऑगस्टमध्येदेखील हिरमोड केला. त्यामुळे पावसाबाबतच्या अपेक्षा यावर्षी फोल ठरतात, असेच चित्र समोर असताना सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोरदार आगमन केले. चार दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला होता. सुमारे ५० मिलिमीटरने पावसाच्या नोंदीत फरक पडल्याने रब्बीकडे शेतकऱ्यांच्या आशा लागल्या आहेत. त्यात शनिवारी एक तास मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. परतीचा पाऊस अशाच पद्धतीने आगामी १५ ते २० दिवसांत पडल्यास पाण्याचा प्रश्न थोड्या फार प्रमाणात मार्गी लागू शकेल. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास निदान पिण्याचे पाणी तरी उन्हाळ्याच्या तोंडावर काही काळ उपलब्ध होऊ शकेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. परभणीत सायंकाळी पावणेसहा ते सातच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. गंगाखेडमध्ये दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाची भुरभुर सुरूच होती.

लातुरात जोरदार
लातूर शहर व जिल्ह्यात शनिवारी जोरदार पाऊस झाला. सव्वासातच्या सुमारास शहरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. रात्री ९ च्या नंतरही तो सुरूच होता.

हिंगोलीतही बरसला
पोळ्याच्या दिवशी बैलांच्या शिंगावर पाऊस पडणे ही बाब शेतकरी वर्गात शुभ मानली जाते. शनिवारी पोळ्याच्या दिवशी शहरासह औंढा नागनाथ, सेनगाव आदी भागांत मध्यम पाऊस झाला. शहरात सुमारे पाऊण तास पाऊस झाला. याशिवाय परिसरातही चांगला पाऊस झाला असून औंढा नागनाथ येथेही तासभर पाऊस झाला. दिवसभर कडक ऊन पडल्यानंतर झालेल्या या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.