आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिवृष्टीमुळे पाच जिल्ह्यांतील ८० टक्के सोयाबीन गेले, कृषी राज्यमंत्र्यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लातूर कृषी विभागातल्या पाच जिल्ह्यांतील ८० टक्के सोयाबीन वाया गेल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीची पाहणी केल्यानंतर त्यांनी सोमवारी लातूरमध्ये आढावा बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खोत म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून मराठवाड्यातल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आलो आहे. लातूर विभागातील उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांत खरिपाच्या ३० लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. त्यामध्ये सोयाबीनचा वाटा सर्वाधिक होता. गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या अतिवृष्टीत जवळपास ८० टक्के सोयाबीन वाया गेले आहे. जे काही सोयाबीन हाताला लागेल ते काळे पडल्यामुळे त्याला बाजारात भाव मिळत नाही. त्यामुळे पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे आणि एनडीआरएफच्या माध्यमातून मदत देणे हे दोन विषय प्राधान्यक्रमाने मार्गी लावले जातील. कृषी, महसूल आणि पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांत समन्वय ठेवून कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पूर्ण नुकसानीचा आकडा यायला आणखी आठवडा लागणार आहे. त्यानंतर तो मुख्यमंत्र्यांकडे सोपवून तातडीने मदत मिळवून दिली जाईल, असे खोत यांनी सांगितले. दरम्यान, खोत यांनी औसा तालुक्यातील तोंडाळी येथे जाऊन पीक पाहणी केली.
तुम्ही म्हणता तसंच छापा...
सोयाबीनला किमान ५ हजार रुपये हमीभाव देऊन सरकारने ते खरेदी करावे, अशी मागणी सत्तेबाहेर असताना सदाभाऊ खोत नेहमी करायचे. पत्रकारांनी त्याची आठवण करून देत आता आपली भूमिका सांगा, असे विचारल्यानंतर खोत यांनी प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. त्यावर “अहो, मी शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे वकिली करतो म्हणा, असे तरी म्हणा,’ अशी सूचना पत्रकारांनी केली. त्यावर तुम्ही तसेच छापा म्हणून खोत मोकळे झाले.
बातम्या आणखी आहेत...