आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनपूर्व पावसाने नदी, नाले, ओढ्यांना पूर;आसू गावाचा तुटला संपर्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परंडा- तालुका व परिसरामध्ये रविवारी(दि.१२) झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने नदी, नाले, ओढ्यांना पूर आल्यामुळे आसू गावाचा संपर्क सुमारे सहा तासांसाठी तुटला होता. यात कोणतीही जीवित, वित्तीयहानी झाली नाही.

परिसरामध्ये पाऊस सुमारे दोन तास कोसळत होता. परंडा ते बार्शी मार्गावरील सोनगिरीजवळच्या उल्का नदीचे जलयुक्त शिवार योजनेतून खोलीकरण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठी झाला. खासापुरी, चांदणी मध्यम प्रकल्पामध्येही पाणी आले. सोनगिरी, खासगाव, ढगपिंपरी, ब्रह्मगाव, पिंपळवाडी, आसू, वाकडी सिरसाव, भांडगाव, कंडारी, पाचपिंपळा, खासापुरी, राजुरी, टाकळी पिंपरखेड, सोनारी, भोंजा, कुंभेजा आदी भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी खरिपाच्या पेरण्या सुरू होत्या. या पावसामुळे तिफणी जागेवरच
सोडाव्या लागल्या.

रात्री ११ नंतर ओसरले पाणी
गावालगतच्या ओढ्यातील पाणी व परिसरातील शेतातील ताली फुटून चांदणी नदीला पाणी आले. ओढ्याला आलेल्या पुरामुळे बाहेरून येणारा व गावातून बाहेर जाणारा मार्ग सुमारे सहा तास बंद पडल्याने गावाचा संपर्क तुटला होता. रात्री ११ वाजता ओढ्याचे पाणी ओसरल्यावर मार्ग सुरू होत गेला.

एकाच दिवशी ६४ मिलिमीटर पाऊस
>आसू येथे रविवारी ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जून २०१५ मध्ये ४२ मिलिमीटर पाऊस झाला होता.
>आसू येथे तब्बल १६ वर्षांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचे गावचे पोलिस पाटील महावीर इतापे यांनी सांगितले.