आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heavy Rainfall In Jalna District After Two Years

दोन वर्षे दुष्काळाची दाहकता भोगणा-या जालना जिल्ह्यावर वरुणराजाने अतिवृष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा (जि. जालना) - दोन वर्षे दुष्काळाची दाहकता भोगणा-या जालना जिल्ह्यावर मंगळवारी वरुणराजाने अतिवृष्टी केली. मंठा शहर परिसरात चार तास मुसळधार पाऊस कोसळला. एकाच दिवसात विक्रमी 212 मिमी पावसाची नोंद झाली. 651.70 अपेक्षित असताना पावसाळ्याच्या एकाच महिन्यात 740 मिमींची वार्षिक सरासरी पावसाने गाठली. या पावसामुळे मंठा परिसरातील ग्रामस्थांनी ढगफुटीसदृश परिस्थितीचा अनुभव घेतला. दरम्यान, मराठवाड्यातही सर्वदूर पावसाचे पुनरागमन झाले. सेलू तालुक्यात एकाचा नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला.


जालना जिल्ह्यातील मंठा शहर परिसरात मंगळवारी रात्री दहा वाजेनंतर धो-धो पावसास सुरुवात झाली. देवठाणा व आंबलगाव परिसरातील काही भागांत तर 2 फुटांपर्यंत पाणी साचले होते. आंवलगाव येथील तीन बैल वाहून गेल्याचा अपवाद वगळता अन्य जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. पावसाचा जोर एवढा प्रचंड होता की, शेतातील पिके वाहून गेली. पिकांबरोबरच मातीही खरडून गेल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या घरात दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी शिरले. शेख शफीभाई, दगडू पवार, दत्ता वाघ यांची राहती घरे जमीनदोस्त झाली. मंठ्यात मुसळधार पाऊस झाला असला तरी तालुक्यात सर्वदूर पाऊस नव्हता. तळणीत तुरळक, तर पांगरी गोसावी परिसरात जेमतेम 16 मिमींची नोंद झाली. शेतीचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतक-यांनी पंचनामा होऊन नुकसानभरपाई मिळावी यासाठी तहसीलदार छाया पवार यांना निवेदन दिले आहे. पावसाच्या जोर वाढल्यानंतर रात्री विद्युत पुरवठा खंडित झाला होता. मंगळवारच्या पावसानंतर बुधवारीही अधूनमधून सरी कोसळत होत्या.


समाधानकारक असला तरी दुष्काळ कायम; चार मोठे प्रकल्प कोरडेच
मराठवाड्यात यंदा रोहिणी नक्षत्रापासून पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्रात पेरण्या आटोपल्या. 24 तासांपासून पुन्हा मान्सून सक्रिय झाला. तथापि, मराठवाड्यातील दुष्काळी स्थिती अद्यापही दूर झालेली नाही. चार मोठे प्रकल्प अद्यापही कोरडेच आहेत. पाऊस समाधानकारक असला तरी दुष्काळ कायम अशी स्थिती आहे.


प्रकल्पांची सद्य:स्थिती
जायकवाडी0
माजलगाव0
येलदरी0
सिद्धेश्वर0
विष्णुपुरी12.87
मानार7.11
इसापूर29.90
अपर मानार49.93
एकूण पाणीसाठा
एकूण प्रकल्प803
क्षमता 7573 दलघमी
आजचा पाणीसाठा516
टक्केवारी7
400 हेक्टरवरील पिके वाहून गेली
1600 हेक्टर मंठा मंडळातील एकूण क्षेत्र
1250 पेरणी क्षेत्र. सर्वाधिक सोयाबीन, कापूस
400 प्राथमिक माहितीनुसार नुकसानग्रस्त क्षेत्र


पैनगंगा, कयाधू दुथडी
हिंगोली जिल्हाभरात 24 तासांत सर्वदूर पाऊस झाला. सरासरी 26.06 मिमी नोंद झाली. या पावसामुळे कयाधू आणि पैनगंगा दुथडी भरून वाहिल्या. नांदेड जिल्ह्यात सरासरी 29.29 मिमींची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस भोकरमध्ये 52 मिमींची नोंद झाली. आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बीड जिल्ह्यात हजेरी लावली. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 158.45 मिमी नोंद झाली. लातूर जिल्ह्यातही सर्वदूर पावसाचे पुनरागमन झाले. 31.80 मिमींची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस उदगीरमध्ये कोसळला. परभणी जिल्ह्यात मंगळवारी रात्री सुरू झालेला पाऊस बुधवारी सकाळपर्यंत कोसळत होता. सरासरी 50.89 मिमी पाऊस कोसळला. सेलू तालुक्यातील हातनूर ते हातनूर पाटीदरम्यान खडकी नाल्याला आलेल्या पुरात मारुती गुणाजी सहजराव (27) हा युवक वाहून गेला. त्याचा मृतदेह 250 फूट दूर आढळून आला.


परिस्थिती नियंत्रणात
देवठाणा व आवलगावची परिस्थिती बिकट होती. रात्री उशिरा पाणी कमी झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. पंचनामे करून माहिती गोळा केली जाईल.
छाया पवार, तहसीलदार, मंठा


अतोनात नुकसान
पावसाचा जोर एवढा होता की अनेकांची शेती अवजारे, कडब्याच्या गंजी वाहून गेल्या. याबाबत प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन पंचनामे करावेत.
सुखदेव मोरे, ग्रामस्थ, देवठाणा, ता. मंठा


पुन्हा अतिवृष्टीची शक्यता
एका तासात 2 इंच पाऊस (50 मिमी) झाला तर त्याला ढगफुटी म्हणता येते. त्यामुळे मंठ्यात ढगफुटी झाली. अजूनही मान्सूनचे ढग सक्रिय आहेत. येत्या 24 तासांत अतिवृष्टी होऊ शकते.
श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड