आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेसाठी सरसावले मदतीचे हात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - शिक्षणाचा वसा घेतलेल्या लिखित पिंप्री (जि. जालना) येथील संत तुकाराम गुरुकुलाचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित करताच अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. औरंगाबाद येथील प्रा. डॉ. प्रशांत पाटील यांनी नुकतीच आश्रमास भेट दिली. गुरुकुलातील दत्तक योजनेतील एका मुलीचे पालकत्व स्वीकारत त्यांनी 11 हजार रुपयांची देणगी धनादेशाद्वारे दिली. गुरुकुलाच्या जागेतील फळबागेत भाजीपाला व इतर उपयोगी झाडांच्या माध्यमातून शाळेला स्वयंपूर्ण करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

रामकिसन सोळंके यांनी घर विकून सन 1993 मध्ये दहा गावांतील सतरा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाने ज्ञानमंदिराची उभारणी केली. आज 110 विद्यार्थी या आश्रमात शिक्षण घेत आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता न येणा-या विद्यार्थ्यांना गुरुकुलमध्ये मोफत शिक्षण देण्यात येते. 16 मुलींना दत्तक घेऊन सोळंके दांपत्याने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. गुणवत्ता असली तरी अद्यापही या शाळेला शासनाची मान्यता मिळालेली नाही. यासंदर्भात ‘भिक्षेवर चालते शाळा’ या मथळ्याखाली 21 जानेवारी रोजी ‘दिव्य मराठी’च्या अंकात विशेष वृत्त प्रकाशित झाले होते. वृक्षसंवर्धन, जलव्यवस्थापन यामध्ये जनजागृती करणारे औरंगाबादचे प्रा. डॉ. प्रशांत पाटील यांनी या वृत्ताची दखल घेऊन गुरुवारी लिखित पिंप्री (जि. जालना) येथील संत तुकाराम गुरुकुल आश्रमास भेट दिली. सागाच्या तीनशे झाडांमध्ये वसलेल्या या निवासी शाळेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून अनेक उपयुक्त सूचना केल्या.

जीवन साफल्याची प्रचिती - गुरुकुलाची मांडणी, कार्य आणि व्यवस्था उत्तम आहे. मी गुरुकुलात न्याहारी आणि दुपारचे जेवणही केले. आहार संतुलित, पौष्टिक असून विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे. सागवानाची झाडे व इतर निर्सगरम्य परिसरामुळे एकाग्रता वाटते. रामकिसन सोळंके व विजय सोळंके यांच्या कार्याची येथे आल्यानंतर खात्री पटली. - प्रा. डॉ. प्रशांत पाटील, निवृत्त प्राध्यापक