आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीनदयाळ उपाध्याय जयंतीः ३२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १० हजारांची मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- देशात नरेंद्र मोदींचे सरकार विराजमान झाल्यानंतर वर्षभरात या सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण योजना राबवल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतीमालाला भाव, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात वीज दिली जाणार आहे. आगामी काळात कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा विचार न करता कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधावा. याबरोबरच गावातील आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसाठी गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवून त्यांचे आधार व्हावे, असे आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर
यांनी केले. दरम्यान, ३२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० हजारांची मदत देण्यात आली.

श्रीगणेश महासंघ आणि मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात जिल्ह्यातील ३२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून प्रत्येकी साडीचोळी व रोख १० हजारांची मदत पालकमंत्री लोणीकर यांच्या हस्ते देण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून सुनील आर्दड, भुजंग गोरे आदींची उपस्थिती होती. लोणीकर म्हणाले, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंबीय रस्त्यावर येणार नाही यासाठी विविध योजना राबवण्यात येणार असून त्यांच्या शेतासाठी प्रत्येक १ विहीर अधिग्रहित केली जाणार आहे. याशिवाय त्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न केला जाणार आहे. आत्महत्या रोखण्यासाठी शेतीमालाला भाव, प्रत्येकाच्या शेतात वीज दिली जाऊन शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. सुनील आर्दड म्हणाले, पालकमंत्री लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली असून शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार न करता कुठलीही मदतीची आवश्यकता असल्यास मातोश्री संस्थेशी संपर्क साधावा, त्यांना शक्य होईल तेवढी मदत केली जाईल. कार्यक्रमाच्या प्रारंभी दलित चळवळीतील स्व. बाबुलाल पंडित यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सूत्रसंचालन धनसिंह सूर्यवंशी
यांनी केले.
महिलांनी दिला एकमेकींना आधार
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी आयोजित कार्यक्रमात उपस्थित नागरिकांसमोर मदत स्वीकारताना अनेक महिलांना अश्रू अनावर झाले. याप्रसंगी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांनी एकमेकींना धीर देऊन रडण्याचे नव्हे, तर जगण्याचे बळ देऊन एकमेकींचे सांत्वन केले.
आत्महत्याग्रस्तांच्या शेतात विहीर
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार म्हणून राज्य शासन प्रत्येकाच्या शेतात ३ लाखांपर्यंत विहीर उभारून त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला सक्षम बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सदरील कुटुंबातील पाल्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी योजना राबवण्याच्या प्रयत्नात आहे, असे पालकमत्र्यांनी सांगितले.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते देण्यात आली. याप्रसंगी सुनील आर्दड आदी. छाया : नागेश बेनीवाल