आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक दिवा जाणिवेचा : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शांतीवनने स्वीकारले पालकत्व

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- एकीकडे सगळे जग दिवाळीच्या झगमगाटात उजळून निघत असताना दुसरीकडे घरात कर्त्या पुरुषाने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. पदरात 2 मुले आणि केवळ 2 एकर शेती अशा अवस्थेत तिला चिमुकल्यांची भविष्याची चिंता होती. तिच्या या अंधाऱ्या आयुष्यात ‘शांतीवन’ने प्रकाशाचे किरण आणून दिवाळी सार्थक केली. 

कायम दुष्काळी असलेल्या पाटाेदा तालुक्यातील कुसळंबचे गोरक्ष परशुराम पवार, अवघी दोन एकर शेती तीही तोट्यातच. बँकांसह खासगी सावकारांकडूनही कर्ज घेतले अन् कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करताना परतफेड करताच आली नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर गळफास घेत त्यांनी आयुष्यावरचेच कर्ज फेडून टाकले. घरातल्या कर्त्या पुरुषाच्या निधनाने पत्नी अयोध्या, दहावीत शिकणारा मोठा मुलगा गणेश आणि पाच वर्षांचा छोटा आदित्य यांच्यावर आभाळच कोसळले.  अयोध्या यांच्यासमोर तर फक्त अंधार दाटला. मुलांचे शिक्षण, भविष्य, रोजीरोटी यांची चिंता. ही बाब ‘शांतीवन’ सामाजिक प्रकल्पाचे दीपक नागरगोजे यांना कळली. त्यांनी या कुटुंबाची भेट घेत त्यांना तातडीची दहा हजारांची मदत करतानाच छोट्या आदित्यला शांतीवनात शिक्षणासाठी दत्तक घेतले तर आयटीआय करणाऱ्या मोठ्या गणेशच्याही पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली. ऐन दिवाळीत केलेल्या या मदतीने पवार कुटुंबियांच्या घरात मदतीचा दिवा लागला आहे.
 
शांतीवन ठरतेय आधारवड 
वंचित, उपेक्षित, अनाथ, रेड लाईट एरियातील मुले, परितक्ता महिलांसाठी शांतीवन आधारवड ठरते आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी सुरु झालेला हा प्रकल्प आता सर्व क्षेत्रातील मुलांसाठी काम करतो आहे. राज्यातील एक आदर्श प्रकल्प अशी शांतीवनाची आेळख आहे.
बातम्या आणखी आहेत...