आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडच्या नारायणगडावर फडकला सर्वात उंच भगवा, गडावर 121फुट उंचीचा ध्‍वज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शिवबा या सामाजिक युवा संघटनेने संत-महंतांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्याची धाकटी पंढरी असलेल्या श्रीक्षेत्र नारायणगडावर १२१ फूट उंच व ३० बाय ५० लांबी-रुंदी असलेला भगवा ध्वज फडकवला असून महाराष्ट्रात सर्वात मोठा हा  ध्वज असल्याचा दावा शिवबा संघटनेने केला आहे.   
 
मराठा समाजाला सरकारकडून अजूनही आरक्षण दिले जात नाही. या समाजाला झुलवत ठेवण्याचे काम राज्य सरकार करत असून यासाठीच शिवबा संघटनेने मराठा समाजातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरांच्या प्रश्नावर लढण्याचा निर्णय घेतला असून नारायणगडावर हा सर्वात मोठा भगवा ध्वज फडकवून सत्ताधाऱ्यांना एक संदेश दिला असल्याचे संघटननेे म्हटले अाहे.  संघटनेच्या कार्याची सुरुवात या गडावरून करण्यात आली आहे. 

इंदूर येथील महाराणी चौकातील एका कारागिराकडून १२१ फुटी भगवा ध्वज तयार करून घेण्यात आला असून, जवळपास तीन महिने ध्वजाचे काम करण्यात येत होते. यासाठी एका समाजसेवकाने भगवे कापडही दिले.  नारायणगडावर हा भगवा फडकवण्यासाठी ट्रस्टींनीही परवानगी  दिल्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनी  गडाचे मठाधिपती महंत शिवाजी महाराज व जिजाऊ माँसाहेब यांचे वंशज शिवाजीराजे जाधव,  अध्यक्ष मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

शेतमजुरांसाठी काम करणार   
छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रात भगवा ध्वज फडकवून स्वराज्याची बांधणी केली होती. अगदी त्याचप्रमाणे आमची संघटना राज्यातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरांसाठी काम करणार आहे. आमची संघटना  कोणत्याच पक्षाशी बांधील नसून कुठलेही राजकारण केले जाणार नाही - हनुमान मुळिक, जिल्हाध्यक्ष, शिवबा संघटना.  

५ मार्च रोजी मेळावा   
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना राज्य सरकारने शासकीय सेवेत घ्यावे, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांचे प्रश्न सुटावेत या मागणीसाठी संघटनेच्या वतीने येत्या ५ मार्च रोजी गडावर  शेतकरी कुटुंबांचा मेळावा होणार आहे.  मेळाव्याला उदयनराजे भोसले, युवराज छत्रपती संभाजीराजे, राष्ट्रसंत भय्यू महाराज, माँ जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली अाहे.  
बातम्या आणखी आहेत...