आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड - भगवा आणि दहशतवाद दोन्ही परस्परविरोधी शब्द आहेत. राजकारण्यांनी धर्माचे आचरण केले, तर दहशतवाद निर्माण होणार नाही, असे स्पष्ट मत करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी मांडले. शहरातील प्रमोद कुलकर्णी यांच्या निवासस्थानाला त्यांनी मंगळवारी भेट दिली. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
शंकराचार्य म्हणाले, धर्म हा सर्व समाजाला जोडणार असतो. त्यामुळे निर्माण होणारी अतूट ताकद ही देश संरक्षार्थ महत्त्वाची असते. धर्म पाळत होते तो पर्यंत देशावर आलेले संकटे परतवून गेली. परंतु इंग्रजांनी जातींमध्ये मतभेद पसरवून धर्मावर आघात केले परिणामी लोक विभक्त झाले. देशावर संकटे निर्माण झाली.
सरकार नेहमीच दुटप्पी भूमिकेत असते तसेच राजकारणीही नेहमीच बदलणारे असतात त्यांच्याबद्दल काहीच न बोलणे बरे, अशी टीप्पणी करून ते म्हणाले, सध्या ब्रिटिशांच्या नीतीनुसारच राजकारण्यांद्वारे जातीजातींमध्ये मतभेद निर्माण केले जात आहे. हे रोखण्यासाठी संस्कृती, परंपरा, समाज व्यवस्था सुरक्षित ठेवत देशातील राजकारण्यांवर धर्माचा अंकुश असला पाहिजे, असेही शंकराचार्य यांनी सांगितले.
स्त्री सुरक्षित; पुरुष बंधनात
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री पूर्णपणे सुरक्षित आहे. तिच्यापेक्षा अधिक बंधने धर्माने पुरुषांवर आहेत. यात पहिले पित्याचे कर्तव्य, दुसरे पुरुषार्थ आणि तिसरे मुलांची कर्तव्य अशा बंधनामध्ये पुरुष बांधला आहे. तसेच विवाहप्रसंगी पुरुषाकडून प्रतिज्ञा करून घेतली जाते. सर्व बाबतीत पुरुषांवर धर्माने बंधने घातली आहेत, परंतु देशामध्ये स्त्री सुरक्षित नाही, असे जाहीरपणे मतमतांतरे मांडली जात आहेत. संस्काराप्रमाणे आचरण केल्यास कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होत नाही, असेही त्यांनी सांगितले.
भस्मातून परदेशात शेती
भारत देशाच्या संस्कृती, परंपरावर अन्य देशांमध्ये संशोधन केले जात आहे. इतर देशांमध्ये यज्ञ केले जात आहेत. त्या यज्ञाच्या भस्मातून उत्तम प्रकारे शेती केली जात आहे. तसेच यज्ञासंदर्भात विविध प्रयोग केले जात आहेत. उदा. यज्ञ परिसरामध्ये काही गर्भवती महिलांची राहण्याची व्यवस्था केली तर अन्य ठिकाणी काही गर्भवती महिलांची व्यवस्था केली. यज्ञ परिसरातील महिलांच्या मुलांचा बुद्धय़ांक हा अन्य ठिकाणी असलेल्या महिलांच्या मुलांपेक्षा अनेक पटींनी जास्त असल्याचे प्रयोगात सिद्ध झाले आहे, परंतु भारतामध्ये याबद्दल विरोध केला जात आहे ही शोकांतिका आहे, असेही त्यांनी सांगितले.
निर्माल्याचे जलचरांना खाद्य
नदीमध्ये निर्माल्य टाकू नका, त्यामुळे प्रदूषण होत आहे, अशी ओरड शासनाकडून होतेय, परंतु निर्माल्याचा फार मोठा उदात्त हेतू आहे. वाहत्या पाण्यामध्ये निर्माल्य टाकल्यास ते काही अंतरावर किनार्याला थांबते. निर्माल्य कुजल्यावर जलचर प्राण्यांना खाद्य निर्माण होते. त्यामुळे प्रदूषण होत नाही. गणेश मूर्ती मातीच्या असाव्यात, परंतु त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या र्मयादेपेक्षा मोठय़ा बनवल्या जातात यावर कोणी नियंत्रण ठेवावे, असाही प्रश्न शंकराचार्यांनी उपस्थित केला. नागरिकांनी विविध सणांचे वैचारिक अधिष्ठान लक्षात घेऊनच ते साजरे करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.