आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्तधनासाठी घर खोदणारे गजाआड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - महाराजाने दिलेल्या माहितीवरून मांत्रिकांच्या मदतीने गुप्तधन काढण्यासाठी येथील मंगळवारा भागातील घरात मंत्रांच्या उद्घोषात खोदकाम चालू होते. याच वेळी शहर पोलिसांच्या पथकाने गुप्तधन काढण्यात सामील झालेली टोळीच मंगळवारी पहाटे गजाआड केली. मंत्रतंत्राने धन मिळाले नसते, तर नरबळीही देण्याची तयार केली होती, अशी धक्कादायक कबुली या टोळक्याने दिली आहे.

सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास मंगळवारा भागात गुप्तधनासाठी खोदकाम सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, शहर पोलिस ठाण्याच्या फौजदार प्रियंका पाटकर या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाल्या. ज्या घरातून खोदकामाचा आवाज येत होता त्या घराचा दरवाजा वाजवण्यात आला. घरमालक अमोलचंद नारायण कंदी यांनी दरवाजा उघडल्यानंतर पोलिसांनी घराची तपासणी केली असता, घरात चौकोनी आकाराच्या खड्डय़ात खोदकाम करण्यात येत असल्याचे त्यांना दिसून आले.

खड्डय़ाच्या चारही बाजूंनी लिंबू, कुंकू, गुलाल-बुक्का, लाल मिरच्या, केसांचा पुंजका व इतर साहित्य दिसून आले. तसेच एक महिला उर्दू भाषेत मंत्र पठण करीत होती. पोलिसांनी घरमालक अमोलचंद कंदी याला तंबी देऊन विचारणा केली असता, त्याने सर्व हकिकत कथन केली. भिक्षा मागण्यासाठी आलेल्या एका महाराजाने घरात गुप्तधन असल्याचे सांगितले. त्यानंतर धनाची लालसा जागृत झालेल्या अमोलचंदने परभणी येथील शेख खदीर शेख मियाँ याला जागा शोधण्यासाठी बोलावले. सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील शेख मुसा शेख शरीफ आणि नर्सी नामदेव येथील शेख फरजानाबी शेख हयात यांनाही धनाचा हंडा शोधण्याच्या कामी लावण्यात आले.

ठरल्यानुसार सोमवारी रात्रीचा मुहूर्त काढून येथील अमोलचंद (55) व त्याचा मुलगा नमित कंदी (30), शेख मुसा, शेख फरजानाबी (55), राहोली येथील शेख मिनाज शेख बशीर (30), शेख अमीन शेख अल्लाउद्दीन (32), शेख रियाज शेख अल्लाउद्दीन (34) यांनी खोदकाम सुरू केले. याप्रकरणी शहर पोलिसात जादूटोणाविरोधी विधेयक 2013 च्या कलम (2) (1) (ख) अन्वये आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सर्वांना अटक करण्यात आली.

असे शोधले गुप्तधनाचे स्थळ
अमोलचंद कंदीच्या घराच्या दोन खोल्यांपैकी कोणत्या खोलीत आणि निश्चित कोणत्या ठिकाणी गुप्तधन आहे, याचा शोध घेण्यासाठी मांत्रिकांनी अष्टधातूच्या थाळ्यांचा वापर केला. थाळ्यावर लिंबू, कुंकू, गुलाल, बुक्का ठेवून त्यावर कापूर जाळण्यात आला. नंतर मंत्र पठण करताच थाळ्याला गती मिळाली आणि थाळी गुप्तधनाच्या जागी जाऊन थांबली. तेथेच नंतर खोदकाम हाती घेण्यात आले.

हंडाभर सोन्यासाठी नरबळीचीही होती तयारी
गुप्तधनाचा हंडा शोधण्यासाठी कामाला लावलेल्यांना केवळ मंत्रतंत्राच्या जोरावर यश आले नाही, तर पशुबळी देण्यात येणार होता. पशुबळीनेही धन हाती आले नाही, तर नरबळीही देण्यात येणार होता, अशी धक्कादायक कबुली मांत्रिक शेख फरजानाबी आणि शेख खदीर यांनी पोलिसांना दिली.

धनाचा हंडा हाती पडण्यापूर्वी टोळके गजाआड
एका महिन्यापासून अमोलचंद कंदी घरातील गुप्तधन काढण्याच्या प्रयत्नात होता. यासाठी त्याने परभणी, पुसेगाव, नर्सी नामदेव, राहोली येथील मांत्रिकांना सोबत घेतले. मिळालेले धन सर्वांनी वाटून घेण्याचे ठरले आणि नंतर खोदकामाचा मुहूर्तही काढला. पूजा केल्यानंतर गुप्तधन काढण्याची कला अवगत असलेल्या शेख फरजानाबीने उर्दू भाषेत मंत्र पठण सुरू केले. तसेच खोदकामही सुरू झाले; परंतु शेजार्‍यांना शंका आल्यावर गुप्तधनाची गुप्त माहिती पोलिसांपर्यंत गेली आणि सर्व जण गजाआड झाले.

(फोटो - खोदकाम करणार्‍या आरोपीस पोलिसांनी रंगेहाथ पकडले. छाया : सुधाकर वाढवे)