आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीच्या लढतीत पक्षश्रेष्ठींचीच प्रतिष्ठा पणाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - हिंगोली लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून सोडवून घेत कॉँग्रेसने अपेक्षेप्रमाणे युवक कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमदार राजीव सातव यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेकडून हा मतदारसंघ खेचून आणण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असेल. दुसरीकडे, शिवसेनेचे विद्यमान खासदार सुभाष वानखेडे यांच्यावर पुन्हा पक्षाने विश्वास दाखवला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी त्यांची अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत.

हिंगोली लोकसभा मतदारसंघ तीन जिल्ह्यांत विभागला गेलेला आहे. हिंगोली, कळमनुरी, वसमत (जि. हिंगोली), हदगाव, किनवट (जि. नांदेड) व उमरखेड (जि. यवतमाळ) या विधानसभा मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. त्यापैकी हिंगोली, कळमनुरी, हदगाव व उमरखेड हे मतदारसंघ काँग्रेसकडे, तर वसमत आणि किनवट हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. ही बाब राजीव सातव यांच्यासाठी जमेची बाजू आहे. मात्र, दुसरीकडे हिंगोलीची जिल्हा परिषद व मतदारसंघातील बहुतांश पंचायत समित्या, नगर परिषदांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व, हदगावातून सलग तीन वेळा आमदारकी ही खासदार सुभाष वानखेडे यांची बलस्थाने आहेत. मात्र, वानखेडे लोकसभेत जाताच हदगाव मतदारसंघ काँग्रेसकडे गेला.

राजीव सातव हे माळी समाजातून, तर वानखेडे हे मराठा समाजातून आहेत. त्यामुळे या मतदासंघात मराठा विरुद्ध बहुजन समाजातील उमेदवार, असे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे. कॉँग्रेसचा परंपरागत दलित, ओबीसी मतदार ओढण्याचा सातव यांची प्रयत्न राहील, तर सर्व मराठा समाजाचे पाठबळ मिळवण्याचा वानखेडे प्रयत्न करताना दिसतात.

वानखेडे यांचे ‘मातोश्री’शी चांगले संबंध आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील असूनही त्यांनी गेल्या वेळी उमेदवारी पदरात पाडून घेतली होती व राष्ट्रवादीच्या तत्कालीन केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचा सुमारे 75 हजार मतांनी पराभव केला होता. यंदा, मात्र स्थानिक शिवसेना-भाजपच्या पदाधिकार्‍यांचा वानखेडेंच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच छुपा विरोध होता. त्यामुळे या नाराजांची मोट बांधण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल. तसेच सातव यांच्यासाठी कॉँग्रेसने राष्ट्रवादीच्या ताब्यातील ही जागा वरिष्ठ पातळीवर वजन वापरून मिळविल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नाराजांना सोबत घेऊन चालणे हे सातवांसमोर आव्हान असेल. हे दोन्ही उमेदवार आपापल्या पक्षातील श्रेष्ठींचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या लढाईत त्यांना ‘बाय हूक ऑर कूक’ विजयश्री खेचून आणायची आहे.

दोघांचेही काम चालेल आदेशावर
राजीव सातव हे ‘राहुल ब्रिगेड’चे नेते मानले जातात. राहुल यांच्यामुळेच त्यांना युवक कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळाले. त्यामुळे वरून आदेश आल्यानंतर नाराजांनाही त्यांच्यासाठी काम करावेच लागेल, असे कॉँग्रेसच्या गोटातून सांगितले जाते. दुसरीकडे, ‘मातोश्री’हून आदेश येताच स्थानिक शिवसैनिकांना रुसवे-फुगवे सोडून द्यावे लागतील, असा पक्षाचा कयास आहे. हिंगोलीत अद्याप बसपने उमेदवार जाहीर केला नाही. 2009 मधील निवडणुकीसारखी हवा नसल्याने प्रयत्न करूनही बसपला यंदा मराठा किंवा मातब्बर उमेदवार अद्याप तरी मिळालेला नाही. मतविभाजन करणारा बसप कोणाला उमेदवारी देतो, याकडे दोन्ही प्रमुख पक्षांचे लक्ष लागले आहे.