आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेचे श्रेय लाटण्यासाठी आटापिटा; खासदार वानखेडे-सातवमध्ये स्पर्धा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- नागपूर येथील अजनी रेल्वेस्थानक ते कुर्ला, मुंबईपर्यंत हिंगोलीमार्गे जाणार्‍या रेल्वेगाडीची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केल्यानंतर आता ही गाडी प्रत्यक्ष धावण्याआधीच तिचे श्रेय लाटण्यासाठी खासदार सुभाष वानखेडे आणि आमदार राजीव सातव यांच्यात स्पर्धा लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या या आटापिट्यामुळे नागरिकांची मात्र चांगलीच करमणूक होत आहे.

हिंगोलीमार्गे सुरू होणारी रेल्वेगाडी कळमनुरीचे आमदार राजीव सातव यांच्यामुळेच घोषित झाली असल्याचे दाखवण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी शनिवारी सातव यांचा जंगी सत्कार केला. रेल्वे विकास समितीचे जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेसचे स्थानिक नेते नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यासह सातव समर्थकांनी येथील केमिस्ट भवनात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी सातव म्हणाले की, मुंबईसाठी रेल्वेगाडी असावी ही अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली. यासाठी संघर्ष समितीचे प्रयत्न मोलाचे आहेत. ममता बॅनर्जी यांचे पद गेल्यामुळेच ही रेल्वेगाडी सुरू झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले. तत्पूर्वी रेल्वेगाडी केवळ सातव यांच्यामुळेच घोषित झाल्याचे आयोजकांनी सांगितले. सातव यांना खासदार केल्यास जिल्ह्याचे सर्व प्रश्न सुटतील, असा दावा करून आगामी लोकसभेसाठी त्यांनाच निवडून देण्याचे आवाहन संयोजकांनी केले.

संयोजकांच्या दाव्याला सातव यांनी त्यांच्या भाषणात खोडूनही टाकले नाही. यामुळे आगामी लोकसभा डोळ्यांसमोर ठेवून सातव गटाने घोषित झालेल्या रेल्वेचे श्रेय लाटण्याचा आटापिटा चालवला असल्याचे दिसून येते, तर रेल्वेगाडीची घोषणा होताच खासदार सुभाष वानखेडे यांनी प्रसिद्धिपत्रक काढून आपल्या पाठपुराव्यामुळेच रेल्वे घोषित झाल्याचा दावा केला होता.

सोहळ्याचे आयोजन समितीचे
ज्या रेल्वे विकास समितीने हा कार्यक्रम घेतला ती समिती जर सर्वसमावेशक असती तर या रेल्वेसाठी सतत पाठपुरावा करणाºया खासदार सुभाष वानखेडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचाही सत्कार घेतला असता, असेही नागरिकांमधून बोलते जात आहे. रेल्वे समितीचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, मिलिंद यंबल, शरद जयस्वाल, अ‍ॅड. सीताराम राठोड, इंदरचंद सोनी आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सातव यांचेच प्रयत्न मोठे
या गाडीसाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न चालू असले तरी आमदार राजीव सातव यांनी सतत पाठपुरावा केला. रेल्वेमंत्र्यांशी त्यांनी स्वत: चर्चा केली आणि ही मागणी पूर्णत्वास नेली. यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्यांनी प्रयत्न केले त्यांना श्रेय देण्यात काहीही गैर नाही.’
-नंदकिशोर तोष्णीवाल, जिल्हाध्यक्ष, रेल्वे विकास संघर्ष समिती.

हिंगोली, वाशीमकरांच्या प्रयत्नांमुळे रेल्वेची घोषणा
हिंगोलीमार्गे मुंबईसाठी गाडी सुरू व्हावी यासाठी कोणाही एका लोकप्रतिनिधीने प्रयत्न केला नाही. यासाठी सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि विशेषत: वाशीम व हिंगोली जिल्ह्यांतील एक नाही तर सर्वच रेल्वे विकास समित्यांचा पाठपुरावा महत्त्वाचा आहे. रेल्वेसाठी आपणही प्रयत्न केले होते. यासाठी मी स्वत: आणि शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनीही रेल्वेमंत्र्यांकडे मागणीही केली होती.’
- सुभाष वानखेडे, खासदार