आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत नगर परिषदेच्या कार्यालयाची प्रचंड तोडफोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - येथील नगर परिषदेत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने तोडफोड केली. पंखे, आग विझविणारे ‘एक्स्टींग्यूशर’, दालनांच्या काचा, खुर्च्या या सामानाची सुमारे 20 मिनिटे तोडफोड करून हे टोळके तेथून पसार झाले. यामध्ये जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी भाजपचे नगरसेवक गणेश बांगर, शिवसेनेचे शहरप्रमुख अशोक नाईक यांच्यासह अन्य 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नगर परिषद कार्यालयात आज सकाळी 10.30 च्या सुमारास गणेश बांगर, अशोक नाईक, गोपाल अग्रवाल यांच्यासह अन्य 7 तरुण हातात लोखंडी रॉड घेऊन आले आणि कार्यालयाचे अ‍ॅल्युमिनियमचे दरवाजे लाथांनी तोडून टाकले. त्यानंतर नगर परिषदेचे बैठक सभागृह, सीईओंच्या दालनासमोरील भाग आणि नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या दालनासमोरील पंखे, दरवाजांच्या काचा, खुर्च्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. सरकारी मालमत्तेची सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान करून हे टोळके पळून गेले. या प्रकारानंतर पोलिस उपअधीक्षक सुनील लांजेवार, पीआय सी.पी. काकडे व शहर पोलिसांचे पथक नगर परिषदेत दाखल झाले. पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे हेसुद्धा घटनास्थळी दाखल आले. आरोपींच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले. पथकाने दुपारी 12 वाजता अशोक नाईक,
नगरसेवक बांगर, अग्रवाल यांना ताब्यात घेण्यात आले.
आर्थिक हितसंबंध !: शहरात दूषित पाणी पुरविणा-यांचा निषेध असो, विकास कामे मार्गी लावा, अशी घोषणाबाजी तोडफोड करणा-यांनी केली होती; परंतु पोलिसांनी अटक केल्यावर तोडफोड केली असल्याचे आरोपींनी नाकारले. मात्र, या घटनेमागे आर्थिक हितसंबंध आहेत. नगर परिषद कार्यक्षेत्रात होणा-या कामांमधून मिळणारी टक्केवारी आणि कामांचे कंत्राट या बाबी या तोडफोडीमागे असल्याचे समजते. या बाबीवर बोलण्यास मात्र नगर
परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी नकार दिला.
कारण स्पष्ट नाही
नगर परिषदेत झालेली तोडफोड शुक्रवारी सुटीच्या दिवशी झाली आहे. कार्यालयात कुणीच नसल्याने तोडफोड करणा-यांचे म्हणणे काय होते हे समजू शकले नाही. त्यामुळे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपासातच ते निष्पन्न होईल.
भारत राठोड, मुख्याधिकारी.