हिंगोली / नांदेड - मराठवाड्यातील हिंगोली, बीड, नांदेड शहर व जिल्ह्यात मंगळवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे कापसासह अन्य खरीपाच्या पिकाला जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत.
मंगळवारी सकाळपासूनच पावसाने पडण्यास सुरूवात केली होती. हिंगोली, बीड, नांदेड जिल्ह्यात सुमारे दीड ते दोन तास चांगलेच झोडपून काढले. आज झालेला पाऊस सर्वदूर असल्याने जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांना या पावसाचा चांगलाच फायदा झाला. दुपारी २ वाजेपर्यंत नांदेड आणि हिंगोली व बीड जिल्ह्यात पावसाचा जास्त जोर होता. त्यानंतर औंढा नागनाथ, कळमनुरी आणि वसमत तालुक्यातही
जोर वाढला.
दुपारी ४ नंतरही जिल्हाभरात मेघगर्जनेसह पाऊस चालूच होता. सहा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मूग आदी ७५ ते ९० दिवसांत येणाऱ्या पिकांना आधार मिळाला होता. पावसामुळे कापूस, तूर, ज्वारी या दीर्घकालीन पिकांना किमान २० दिवसांसाठी जीवदान तर दिलेच, शिवाय हळद या पिकालाही मोठाच आधार मिळाला आहे.