आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hingoli News In Marathi, Divya Marathi, Forest Department

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली जिल्ह्यातील ५१४ हेक्टर वनक्षेत्र अतिक्रमणमुक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - वृक्षतोड करून जमीन वहितीखाली काढणाऱ्यांना येथील वन विभागाच्या धडक कारवाईमुळे चांगलाच चाप बसला असून गेल्या १० महिन्यांत तब्बल ५१४ हेक्टर वनक्षेत्र अतिक्रमणातून मुक्त झाले आहे. अतिक्रमण करणाऱ्यांना वन विभागाने रोजगार दिला असल्याने वन विभाग आणि भूमिहीनांमधील संघर्षही टळला आहे.

गायरानालगत असलेली वन विभागाची जमीन, जंगल माथ्यावरील सुपीक जमीन असो की शेताजवळील वन विभागाची जमीन, त्यावरील झाडे तोडून रातोरात जमीन ताब्यात घेण्याचे प्रकार जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर झाले होते. ज्या जमिनींवर अनुसूचित जाती व जमाती समाजातील भूमिहीनांनी ताबा मिळवला आणि जमिनीचे पट्टे त्यांच्या नावे करण्याची प्रक्रिया शासन स्तरावर चालू आहे; अशा जमिनीशिवाय इतर सर्व वन जमिनींवरील अतिक्रमणे काढण्याचा कार्यक्रम वन विभागाने हाती घेतला आहे. याद्वारे १० महिन्यांत वन विभागाने १३६ गावांमधील तब्बल ५१४ हेक्टर जमीन अतिक्रमणमुक्त केली आहे. अतिक्रमण करणारे बहुतांश लोक भूमिहीन होते. तसेच काही जणांना स्वत:ची शेती असूनही वन जमिनीवर ताबा मिळवला होता. अतिक्रमण करणाऱ्या भूमिहीनांसाठी मात्र वन विभागाने रोजगार निर्माण केला आहे. जिल्हाभरातील सुमारे १५०० लोकांना कामधंदा मिळाला.

अतिक्रमणधारकांनीच बांधलेले बंधारे भरले काठोकाठ
अतिक्रमणधारकांच्या ताब्यातून घेण्यात आलेल्या वन जमिनीवर वन विभागाने जेसीबीद्वारे मोठमोठ्या चरी खोदून जमीन शेतीसाठी निरुपयोगी केली आणि त्यावर झाडे लावली, तर या जमिनीवर ओढे, नाले होते त्या ठिकाणी मातीनाले बांधून काढले. उन्हाळ्यात बांधण्यात आलेले हे मातीनाले आता पावसाळ्यात काठोकाठ भरले असून त्यामुळे परिसरातील जलस्रोतांची पाणीपातळी वाढण्यास मदत होत आहे. गत उन्हाळ्यात वन विभागाने असे ३० बंधारे बांधले असून ते पाण्याने तुडुंब भरले आहेत.

अतिक्रमणे हटवण्याची मोहीम चालूच राहणार
वन जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम भविष्यातही चालूच राहणार आहे. गेल्या वर्षभरात आम्ही सुमारे ३० टक्के अतिक्रमणे सक्तीने हटवली आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामस्थांना सोबत घेऊनच आम्ही या मोहिमा राबवत असून त्यामध्ये वनग्राम समित्या, तंटामुक्ती समित्यांसह स्थानिक पदाधिकारीही महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. अतिक्रमण करणाऱ्यांना आम्ही रोपवन लागवड, जलसंधारणाच्या कामातून रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यात अद्यापही काही प्रमाणात वन जमिनींवर अतिक्रमण आहेच. त्यांनाही या उन्हाळ्यात हटवले जाईल.
चंद्रशेखर सरोदे, जिल्हा वन अधिकारी