आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत उमेदवारांसह जागेवरून नाराजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- जिल्ह्यातील शिवसैनिक आणि भाजप पदाधिकार्‍यांचा विरोध असतानाही शिवसेनेने खासदार सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली असल्याने महायुतीत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे, तर हातची जागा गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी अटळ झाली आहे. आघाडी आणि महायुतीत चालू असलेली खदखद बसपा किंवा मनसेने हेरल्यास तिसरा पर्याय समोर येण्याचीच शक्यता आहे.

खासदार सुभाष वानखेडे आणि संपर्कप्रमुख सुहास सामंत यांनी शनिवारी जिल्हाभरात रात्री उशिरापर्यंत महायुतीतील घटकपक्ष नेत्यांसोबत बैठका घेतल्या. या बैठकांना महायुतीतील रिपाइं आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी हजेरी लावली असली तरी हिंगोली वगळता कळमनुरी आणि वसमत येथील भाजप पदाधिकार्‍यांनी खासदार वानखेडेंच्या बैठकांना जाणे टाळले. याशिवाय माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा आणि माजी आमदार गजानन घुगे यांनीही या बैठकांना न जाणे पसंत केले. संपर्कप्रमुख सामंत यांच्या आवाहनाला स्थानिक सेना नेत्यांनी केराची टोपली दाखवल्याने खासदार वानखेडे प्रत्यक्ष लढाईपूर्वीच घामाघूम झाले आहेत. दुसर्‍या बाजूला गत निवडणुकीत राष्ट्रवादीकडे असलेली हिंगोलीची जागा काँग्रेसने हिसकावून घेतली आहे. उमेदवारी राजीव सातव यांना मिळणार हे जवळपास निश्चित झाले असल्याने पूर्वार्शमीचा शिवसैनिक असलेल्या राष्ट्रवादीच्या एका माजी खासदाराने बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांची नांदेड येथे भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली. दोन दिवसांमध्ये या नेत्याचा पक्षप्रवेश आणि उमेदवारी निश्चित होणार असल्याचे बसपाच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. परंतु हा मराठा नेता बसपाकडेच नाही तर मनसेकडेही तिकिटाची मागणी करीत आहे. उमेदवारी दोन्हीपैकी कोणत्याही पक्षाकडून मिळवा, राष्ट्रवादीची फौज तुमच्या मागे, असे आश्वासन राष्ट्रवादीतर्फे दिल्याचे सांगितले जाते.