आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पोलिसांसमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची ‘हवा’ फुस्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - नो पार्किंग झोनमध्ये लावण्यात आलेल्या कारच्या चाकांची हवा सोडून देण्यात आल्याने राजकीय ताकद दाखवत त्रागा करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची मस्ती येथील महिला फौजदारांनी उतरवली. माधव बळीराम कोरडे असे कार्यकर्त्याचे नाव आहे.

पत्नी जिल्हा परिषद सदस्या असल्याने माधव कोरडे यांचे पक्षातील वजन थोडेबहुत वाढले आहे. शहरातील नो पार्किंग झोनमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम शहर पोलिसांनी हाती घेतली आहे. दुपारी साडेतीन वाजता फौजदार कोमल तुकाराम शिंदे यांच्या पथकाने महेश चौकात उभ्या असलेल्या वाहनांच्या चाकांची हवा सोडून दिली. यामध्ये कोरडे यांची नंबर नसलेली ‘लोगन डस्टर’ कार होती. कारची हवा सोडल्याचे समजताच कोरडे यांनी राजकीय दबाव आणून फौजदार कोमल शिंदे यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. शिंदे यांनीही दबावाला भीक न घालता सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची तयारी चालवली.

आपल्यावर गुन्हा दाखल होणार या भीतीपोटी कोरडे यांनी नमते घेत माफी मागून दंड भरण्याची तयारी दर्शवली. काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी यामध्ये हस्तक्षेप केला, परंतु फौजदार शिंदे यांनी नियमानुसार कारवाई करीत कोरडे यांच्याकडून 200 रुपये दंड वसूल केलाच.

नियमानुसार कारवाई
‘कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, त्याच्याविरुद्ध पोलिसांकडून नियमानुसार कारवाई केली जाते. त्यामधून कोणालाही सूट देता कामा नये. तसे आदेशच देण्यात आले आहेत. आजच्या प्रकरणातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्याच्याकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.’ सुधीर दाभाडे, पोलिस अधीक्षक, हिंगोली.