आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंदडा समर्थकांच्या ठोशानंतर खासदार गट बॅकफूटवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- माजी मंत्री मुंदडा विरुद्ध माजी खासदार वानखेडे यांच्यातील शीतयुद्धाची परिणीती शनिवारी हाणामारीत झाली. या घटनेत मुंदडा समर्थकांनी स्वत:ला ‘दादा’ समजणाऱ्यांना चांगलाच चोप दिला. ‘माझ्यावर प्रेम करणाऱ्या’ माणसांना टीका सहन झाली नसल्याने प्रत्युत्तर दिले असल्याची भूमिका डॉ. मुंदडा यांनी घेतली, तर खासदार गटाने मात्र हैदोस घालणारे शिवसैनिक नव्हतेच, अशी भूमिका घेत विरोधाची तलवार म्यान केली आहे.
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून डॉ. जयप्रकाश मुंदडा आणि माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यात एकमेकांवर चांगलीच कुरघोडी सुरू आहे. सुरुवातीला टीकाटिप्पणीपर्यंत असलेला विरोध गेल्या महिन्यात व्यक्तिगत आणि कौटुंबिक हेटाळणीपर्यंत गेला. शनिवारी वसमत येथे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. वाद टाळण्यासाठी वसमत येथे न थांबता डॉ. मुंदडा यांनी हिंगोलीचे माजी संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्यासोबत नांदेड येथील कार्यक्रमांना हजेरी लावणे पसंत केले, तर सुभाष वानखेडे हे सुद्धा कार्यक्रमाला हजर नव्हते. मेळाव्यामध्ये खासदार समर्थकांनी डॉ. मुंदडा यांचा उल्लेख ‘गद्दार’ असा करताच, मुंदडा समर्थकांनी वानखेडे समर्थकांची चांगलीच धुलाई केली. यानंतर खासदार समर्थकांनी बॅकफूटवर जाणे पसंत केले आहे. खासदार गटाचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी, हैदोस घालणारे लोक शिवसैनिक नसल्याचे सांगून शिवसेनेत कोणताही वाद नसल्याची सारवासारव गेल्या वर्षभरात प्रथमच केली, तर डॉ. मुंदडा यांनी सारवासारव न करता शिवसैनिकांचा संयम सुटल्याने प्रकार घडला असल्याचे सांगून समर्थकांची पाठ थोपटली आहे. घडलेल्या प्रकारामुळे संपर्कप्रमुख जाधव यांच्यावर अक्षरश: पळून जाण्याची वेळ आल्याने स्वत: उद्धव ठाकरे यांनी प्रकाराची गंभीर दखल घेऊन राडाबाजांना तंबी दिली असल्याचे बोलले जात आहे.

जिल्हाप्रमुखांची सारवासारव
हैदोस घालणारे जर शिवसैनिक नसतील, तर पोलिसांत फिर्याद का दिली नाही, या प्रश्नावर बांगर यांनी हैदोस घालणाऱ्यांची नावे माहीत नसल्याने फिर्याद दिली नसल्याचे सांगितले. अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद का दिली नाही, या प्रश्नावर बांगर यांनी सांगितले, की कार्यक्रमाला स्वत: संपर्कप्रमुख हजर होते. त्यामुळे तेच काय तो निर्णय घेतील, असे सांगून वेळ मारून नेली. तसेच प्रत्येक पक्षात तिकिटासाठी स्पर्धा होतेच, त्यामुळे शिवसेनेतही चालणारच, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.