आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा देऊन शेतातील पिकांची नासधूस केल्याने मानसिक तणावाखाली सापडलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र जिल्ह्यात सुरूच आहे. शुक्रवारी जिल्ह्यात दोन शेतकर्‍यांनी जीवन संपवले असून गेल्या पंधरा दिवसांमध्ये शेतकरी आत्महत्येचा आकडा 7 वर गेला आहे.

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील अशोक गोविंदराव शिंदे (65) या शेतकर्‍याने गुरुवारी शेतात जाऊन विष प्राशन केले होते. रात्री नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर दोन राष्ट्रीयीकृत बँकांचे 2 लाख रुपयांचे कर्ज होते. त्यांच्या शेतात पेरण्यात आलेला गहू अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाला होता. याप्रकरणी कुरुंदा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

हिंगोली तालुक्यातील कलगाव येथील शेतकर्‍यानेही कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपवले. दत्तराव नारायण पौळ (60) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. कर्जबाजारी झालेल्या दत्तराव यांनी कर्जातून सुटका करून घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी काही जमीन विकली आणि उर्वरित 6 एकर जमीन मुलाच्या नावे केली, परंतु शेतीवरील कर्जाचा बोजा कायम असल्याने मानसिक तणाव वाढला. आठ दिवसांपूर्वीच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. घरच्या मंडळींनी त्यांना परावृत्त केल्यामुळे वेळ टळली, परंतु गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांनी रोगर हे पिकावर फवारण्याचे औषध प्राशन केले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.