आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचआयव्हीबाधित दांपत्याला झाली निरोगी पुत्रप्राप्ती, इन्फंट इंडिया प्रकल्पाच्या प्रयत्नांना यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - तो आणि ती एचआयव्हीबाधित. इन्फंट इंडिया या एचआयव्हीबाधित मुलांच्या प्रकल्पात सोबत बालपण गेलेले. त्यांनी लग्नही केले. नुकताच तिने एका पुत्ररत्नाला जन्म दिलाय. मूल एचआयव्हीबाधित नसल्याने त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. प्रकल्पात काम करणारा प्रत्येक जण सध्या याच आनंदात आहे. बाळ निरोगी होण्यासाठी ती गर्भवती असल्यापासून जिल्हा रुग्णालयातील अधिकारी उपचार करत होते.  त्यामुळे या आनंदात तेही सहभागी झाले आणि पेढे वाटून त्यांनीही या चिमुकल्याचे स्वागत केले.   
 
गणेशचे (बदललेेले नाव) आई-वडील एचआयव्हीबाधित. त्यांच्या निधनानंतर नातेवाइकांनी त्याला अव्हेरले. पण दत्ता आणि संध्या बारगजे हे दांपत्य त्याच्या आयुष्यात मायबाप म्हणून समोर आले. यानंतर उभा राहिला इन्फंट इंडिया हा एचआयव्हीबाधित मुलांसाठी काम करणारा प्रकल्प, जो राज्यभरात आदर्श आहे. सीताचीही (बदललेले नाव) अशीच काहीशी कहाणी. तीही अशीच नातेवाइकांनी हाकलल्याने इन्फंटमध्ये दाखल झालेली.. सोबत बालपण गेलेल्या गणेश-सीता  यांचा विवाह दत्ता बारगजेंच्या पुढाकारातून दीड वर्षापूर्वी झाला. ती गर्भवती राहिली  तेव्हा तर प्रकल्पातील सर्वजण आनंदी झाले. पण बाळ एचआयव्हीबाधित होणार नाही ना, हा प्रश्न आला आणि आनंदाची जागा चिंतेने घेतली.  बाळ निरोगी व्हावे यासाठी सुरू झाले उपचार. अखेर रविवारी (१९ फेब्रुवारी) सीताने गोंडस पुत्ररत्नाला जन्म दिला आणि बाळ ठणठणीत जन्मल्याची माहिती मिळताच माता-पित्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले...  
 
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, दत्ता बारगजे, संध्या बारगजे, तत्त्वशील कांबळे, अशोक तांगडे यांनी रुग्णालयातच पेढे वाटून हा क्षण साजरा केला.. एचअायव्हीबाधित दांपत्यालाही निरोगी मूल होऊ शकते, त्यांनी खचून न जाता आनंदी आयुष्य जगावे, अशी ही माझ्या आयुष्यातील मोठी भेट असल्याचे गणेश सांगत असताना त्याचे बाळ त्याच्या कुशीत इवल्याशा डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत हाेते.

इन्फंट ठरतोय आधार    
दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या इन्फंट इंडिया या एचआयव्हीबाधित प्रकल्पातील गणेश पहिला मुलगा. आज या प्रकल्पात ५० मुले, मुली आहेत. एचआयव्हीबाधितांना प्रकल्प आधार ठरत असून तीन ते चार जोडपी विवाहबद्धही झाली आहेत. राज्यापुढे हा प्रकल्प आदर्श ठरत आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्यात आले आहे.    

पहिल्यांदाच नव्या जिवाचे आगमन    
इन्फंटमध्ये येणारी अनेक मुले कधी वर्षात, तर कधी सहा महिन्यांत मृत्यू पावतात. इथल्या प्रत्येक मुलाच्या डोक्यावर मृत्युछाया घोेंगावत असते. पहिल्यांदाच प्रकल्पात कुणाचा तरी जन्म झाल्याने हा उत्सव प्रकल्पात साजरा होत आहे - दत्ता बारगजे, संचालक, इन्फंट इंडिया प्रकल्प, बीड.    
 
सहा महिन्यांच्या तपासणीनंतरच कळेल एचआयव्हीबाबतआईपासून बाळाला एचआयव्ही संसर्ग होण्याचा धोका ५० टक्के असतो; परंतु बाळ किमान सहा महिन्यांचे झाल्यानंतरच त्याची तपासणी करून ते बाधित आहे वा नाही हे समोर येईल. काही प्रकरणांत हा कालावधी दीड वर्षापर्यंतचाही असू शकतो. सध्या तरी बाळाची प्रकृती ठीक आहे - डॉ. नागेश चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड.
बातम्या आणखी आहेत...