आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Home School New Hope Of Autism Children In Nanded

स्वमग्न मुलांमध्ये उमेद जागवणारे नांदेड शहरातील होमस्कूल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - ज्यांना स्वत:चे विश्वच कळत नाही, अशा ऑटिझम अर्थात स्वमग्न मुला-मुलीत उमेद जागृत करून त्यांच्याकडून विविध वस्तू बनवून घेतल्या आहेत. या वस्तूंचे प्रदर्शन टिळकनगर येथील उमेद होमस्कूलमध्ये भरवण्यात आले आहे. मात्र, लोकांचा प्रतिसाद मिळत नाही, अशी उमेदवाल्यांची खंत आहे.

स्वमग्नता हा एक प्रकारचा आजार असून, या आजारांच्या मुलांमध्ये मानसिक वाढीच्या समस्या असतात. अशा मुलांचे संगोपन व पालनपोषण करणे त्यांच्या पालकांसाठीदेखील अवघड काम असते. शहरातील टिळकनगर भागात अंजली रावते यांचा एकुलता एक मुलगा ऑ टिझमग्रस्त आहे. अंजली रावते यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी वाहून घेतले आहे. सणवार, लग्न, मुंज, दिवाळी, दसरा, पाडवा अशा कोणत्याच गोष्टीत त्यांना गोडी नाही. त्यांचे पती वैद्यकीय अधिकारी आहेत. दोन मुलींचे लग्न झाले असून दोघींचेही सुखी संसार आहेत. टिळकनगर भागातील मोठ्या घरात अंजली व त्यांचा मुलगा असे दोघेच राहतात. ऑ टिझमग्रस्त मुलास हाताने जेवणाचा घास भरवावा लागतो, शर्टची बटणे लावावे लागतात. स्वत:च्या गोष्टीसाठी या मुलांना पालकांची मदत घ्यावी लागते. दर शंभर मुलांमागे एका मुलास हा आजार आढळतो. या मुलांचे वय वाढत जाते, परंतु मानसिकदृष्ट्या त्यांची वाढ होत नाही. त्यामुळे अधिक वयाची मुलेदेखील लहान बालकाप्रमाणे कृती करीत असतात.

आपल्यासारख्याच समदु:खी कुटुंबास आधार मिळावा म्हणून त्यांनी आपल्या मोकळ्या बंगल्यात स्वमग्न मुलांसाठी 2007 पासून उमेद होमस्कूल सुरू केले. शाळा कसली, नाउमेद न होता मुलांचे संगोपन करण्याचे आई-वडिलांना प्रशिक्षणच असते. उमेदमध्ये ऑटिझमग्रस्त 15 मुले-मुली आहेत. त्यांचे आई-वडील दररोज या मुलांना शाळेत आणून सोडतात. काही माता स्वत:ही उपस्थित राहतात. त्या ठिकाणी अशा मुलांना अक्षरांची तसेच दैनंदिन वापरातील वस्तूंची ओळख करून देणे, स्वत:ची कामे स्वत: करण्यासाठी प्रवृत्त करणे अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. कुठलेही शासकीय अनुदान न घेता पालकांकडून मिळणा-या शुल्कातून हे स्कूल अंजली रावते यांनी सुरू ठेवले आहे. पुणे येथील ऑ क्युपेशनल थेरपिस्ट सुनीता लेले यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळते.

उपक्रम
स्वमग्न मुलांच्या मानसिक व बौद्धिक विकासासाठी शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. संगीत तसेच चित्रफिती व कॉम्प्युटरच्या माध्यमातून चित्र रंगवणे, वेगवेगळ्या वस्तूंची ओळख करून घेणे यासारखे कार्यक्रम घेण्यात येतात.

वस्तूंचे प्रदर्शन
कागदापासून बनवलेल्या कॅरीबॅग, फिनेल, दारावरचे मण्यांपासून बनवलेले तोरण, चांदव्याच्या चिमण्या तसेच लोणची व अन्य खाद्यपदार्थ, रेडिमेड ड्रेस यासारख्या स्वमग्न मुलांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन होमस्कूलमध्ये भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी खुले राहणार आहे.
४ज्यांच्या नशिबाला हे दु:ख आले त्यांच्या मानसिकतेचा समाजानेही विचार करून त्यांच्याकडे आपुलकीने बघावे एवढीच अपेक्षा आहे. पुणे येथून रॉ मटेरियल आणून स्वमग्न मुलांकडून विविध वस्तू बनवून घेतल्या. मात्र, लोकांनी प्रतिसादच दिला नाही. ’ अंजली रावते, संचालिका, उमेद होमस्कूल

ओझे कमी झाले
माझी मुलगी सोनिया दहा वर्षांची झाली आहे. चार वर्षांपूर्वी उमेद होमस्कूलमध्ये तिला प्रवेश दिला. दुस-या वर अवलंबून असलेली मुलगी शाळेत गेल्यापासून स्वत:च जेवण करते. मराठीत टाइप करते. होमस्कूलमुळे मनावरील ओझे कमी झाले आहे. ’ ज्योत्स्ना संदीप पाटील, पालक
मुलाची उमेद वाढली
माझा मुलगा प्रणीत 14 वर्षांचा आहे. तीन वर्षांपूर्वी उमेदमध्ये दाखल केले. आज तो स्वत:चे काम स्वत: करतो. लिहायला-वाचायला शिकला. भाजी आणतो, कॉम्प्युटर शिकला. होमस्कूलमुळे आमच्यात नवी उमेद निर्माण झाली आहे. ’ अर्चना किरण देशपांडे, पालक