आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनर किलिंग : पळून गेलेल्या विवाहितेचा खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - प्रियकरासोबत 31 जानेवारीस पळून गेल्यानंतर नाशिक येथे सापडलेल्या विवाहितेचा पती, सासरा, तिचा मामा व भावानेच निर्घृण खून करून मृतदेह जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. 30) उघडकीस आला. पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील या महिलेचे नाव राधा अनिल काळे असे आहे. गावात सुरू असलेली चर्चा पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनीच हा प्रकार उघडकीस आणल्याने खळबळ उडाली आहे.
दारेफळ (ता. वसमत) येथील राधा हिचा विवाह आठ वर्षांपूर्वी एरंडेश्वर (ता. पूर्णा) येथील अनिल काळे याच्यासोबत झाला होता. या दांपत्याला एक मुलगा व एक मुलगीही झाली. मात्र, यादरम्यान राधाचे प्रेमसंबंध गावातील एका तरुणासोबत जुळले. त्यातून ती 31 जानेवारी रोजी त्याच्यासोबत पळून गेली. सासरच्या व माहेरच्या मंडळींनी खूप शोधाशोध केल्यानंतर तीन महिन्यांनी ती नाशिक येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिला घरी आणले. पती अनिल काळे, सासरा सुदाम काळे, राधाचा मामा दिलीप खटिंग (झाडगाव), भाऊ शेषराव भालेराव यांनी तिला समजावून सांगितल्यानंतर याच चौघांनी तिचा काटा काढण्याचे ठरवले. त्यांनी 20 मेच्या दरम्यान एरंडेश्वर येथेच शेतात तिचा खून करून मृतदेह विहिरीत टाकला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी 21 मे रोजी सायंकाळच्या सुमारास तो मृतदेह बाहेर काढून शेतातच जाळून टाकला. मृतदेहाची हाडे व राख गोळा करून ती शेतातीलच एका खड्डय़ात पुरून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, तीन महिने बेपत्ता झालेली व गावात परत आलेली राधा काळे पुन्हा गायब झाल्याची व तिचा खून झाल्याची चर्चा एरंडेश्वरमध्ये सुरू झाली. मागील चार दिवसांपासून सुरू असलेली चर्चा पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पूर्णेचे परिवीक्षाधीन पोलिस अधीक्षक योगेशकुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्यासह कर्मचारी प्रकाश बोके, अशोक पवार, हनुमान कच्छवे, सखाराम टेकुळे आदींनी शुक्रवारी एरंडेश्वरमध्ये जाऊन या सर्व प्रकरणाचा शोध सुरू केला असता त्यांना काही बाबी संशयास्पद आढळून आल्या. त्यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता एका खड्डय़ात हाडे व राख आढळली. ती प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आली असून पती अनिल काळे व सासरा सुदाम काळे यांची सखोल चौकशी केल्यानंतर त्यांना पोलिसी हिसका दाखवताच त्या दोघांनी राधाचा मामा दिलीप खटिंग व भाऊ शेषराव भालेराव यांच्यासह राधाचा खून करून जाळल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पती व सासरा व भावास पोलिसांनी ताब्यात घेतले असून मामाचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
जबाबात विसंगती
पती अनिल काळे व सासरा या दोघांच्या जबाबात विसंगती असून सुरुवातीला भाऊ व मामाच्या मदतीने जिवे मारल्याचे सांगितले, परंतु नंतर पतीने आपण स्वत:च पत्नीचा खून केला असून वडिलांच्या मदतीने मृतदेह जाळल्याचे सांगितले.

अनैतिक संबंधातून हत्या
राधा काळे हिची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून याबाबतची कबुली पती अनिल काळे याने दिली असली तरी जबाबातील विसंगतीमुळे सखोल तपासाची आवश्यकता आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतरच पुढील दिशा मिळेल. डॉ. विवेक मुगळीकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, परभणी

नात्यागोत्यात साटेलोटे
एरंडेश्वरचे काळे व वसमत तालुक्यातील दारेफळ येथील भालेराव या कुटुंबीयांत जवळचे नाते आहे. राधा ही अनिल काळेच्या आत्याची मुलगी असून त्याची बहीण ही भालेराव कुटुंबात दिलेली आहे.