( छायाचित्र - मृत शाहरुख पठाण व निलोफर बेग)
नांदेड - माहूरच्या रामगड किल्ल्यात १० सप्टेंबरला झालेले प्रेमीयुगुलाचे हत्याकांड ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचे स्पष्ट होत आहे. यवतमाळला इंजिनिअरिंग शिकणारे शाहरुख पठाण (उमरखेड) आणि निलोफर बेग (पुसद) या दोघांच्या कुटुंबीयांनीच त्यांच्या खुनाची सुपारी दिल्याचे उघड होत आहे. या प्रकरणी निलोफरचे वडील, भाऊ व काकास नांदेड पोलिसांनी अटक केली आहे.
मारेकरी राजू ऊर्फ राजा रघुनाथ गाडेकर, शेख जावेद पेंटर, रंगराव आणि शेषराव बाबटकर, कृष्णा ऊर्फ बाबू शिंदे यांना पोलिसांनी आधी अटक केली. टोळीचा म्होरक्या रघुनाथ ऊर्फ रघुडॉन ऊर्फ रघुरोकडा नाना पळसकर यास रविवारी अटक झाली. नंतरच खुनाची सुपारी व पैसे सय्यद अन्वरअली अत्तर अली (४४, अभियंता व कंत्राटदार, पुसद), कैसर मिर्झा बहादूर मिर्झा (४४, प्लॉटिंग ब्रोकर, माहूर) यांनी दिल्याचे उघड झाले. त्यांना ताब्यात घेतल्यावर कटात सहभागी निलोफरचे वडील मिर्झा खालेद बेग कमर बेग (४८), विकार अहेमद नबाब जानी बेग (२८), नबाब जानी कमरबेग (५५,), निलोफरचे काका व चुलत भाऊ) यांना पोलिसांनी अटक केली.
शाहरुख व निलोफरचे प्रेमसंबंध मान्य नसल्यानेच हे खून करण्यात आले असावे अशी चर्चा आहे. पोलिसांनी मात्र याबाबत अद्याप अधिक माहिती देण्यास नकार दिला. या प्रकरणात अजून कोणाचा सहभाग आहे याविषयी तपास सुरू असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेतर्फे सांगण्यात आले.