आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाराेपी आमदार कदमांची विश्रामगृहावर बडदास्त; बीडमध्ये पोलिसांकडून व्हीअायपी ट्रिटमेंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या ३०० कोटी रुपयांच्या आर्थिक  घोटाळ्यातील आरोपी आमदार रमेश कदम यांना बीडमध्ये दाखल गुन्ह्यात बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, पुणे सीआयडी पोलिसांच्या ताब्यात असलेले आमदार रमेश कदम यांची सीअायडीकडून शाही बडदास्त ठेवण्यात अाल्याचे समोर आले आहे. गुरुवारी पहाटे पाच वाजता त्यांना बीड शहर पोलिस ठाण्यातून शासकीय विश्रामगृहावर नेण्यात आले. दुपारपर्यंत त्यांना तिथेच ठेऊन दुपारनंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आले.

घोटाळ्यात आमदार कदमांसह तत्कालीन व्यवस्थापक व लिपिकांवर बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या प्रकरणात बुधवारी दुपारी तीन वाजता आमदार कदम यांनी बीड न्यायालयासमोर रिक्षातून हजेरी लावत स्वत: युक्तिवाद केला. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडीही सुनावली. बुधवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान कदम हे रिक्षाने बीड शहर ठाण्यात पोहोचले. त्यांच्यासाठी शाल, उशी, पंखा असे साहित्य घेऊन शहर ठाण्यात कार्यकर्ते सज्ज होते, तर कदमही कोठडीत न जाता शहर ठाण्याच्या कर्मचारी कक्षात बसून हाेते. रात्री १ वाजेनंतर त्यांनी कोठडीत जाणे पसंत केले. दरम्यान, गुरुवारी पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान सीअायडी पोलिसांनी  कदमांना शहर ठाण्याच्या कोठडीतून बाहेर काढून ‘चौकशी’साठी विश्रामगृहावर नेले. तिथे कदमांनी आराम करून अंघोळ, नाष्टा केला. दुपारी बारा वाजता त्यांना विश्रामगृहावरून पोलिस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आले.

रजिस्टरमध्ये खाडाखोड  
सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी विश्रामगृहावर नाव नोंदवताना कदम यांचा शासकीय दौरा दाखवला आहे. त्यात अधिकाऱ्यांची नावे लिहिलेली आहेत. यामध्ये आमदार रमेश कदम यांचेही नाव लिहिण्यात आले होते. मात्र, नंतर अधिकाऱ्यांनी ते नाव खोडल्याचे दिसून आले. 

डासांच्या त्रासाची करणार तक्रार 
बुधवारी रात्री १ नंतर  बीड शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत कदम यांनी डासांचा त्रास होत असल्याने मच्छरच्या कॉइलची मागणी केली. ती पूर्ण करण्यात आली. गुरुवारी  सकाळी कर्मचाऱ्यांना त्यांनी डासांचा त्रास झाला असून त्याची न्यायालयाकडे 
तक्रार करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

कार्यकर्त्यांचा गराडा अन् निर्विकार कदम 
तीनशे कोटींच्या  घोटाळ्यात अकडलेले असताना आरोपी असूनही विश्रामगृहावर कदम यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठी  गर्दी केली होती, तर कदमही जणू काही झालेच नाही, अशा अविर्भावात वावरत होते.  

सीअायडी म्हणते सहकार्य करा 
विश्रामगृहावर आमदार कदम असल्याची माहिती मिळताच पत्रकार तेथे पोहोचले. कदम बाहेर येत असताना त्यांचे फोटो, छायाचित्रण करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना प्रतिबंध करत सहकार्य करा, असे सांगितले. 

तपास सीआयडीकडे, आमचा संबंध नाही 
या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे आहे. आमदार कदमही  त्यांच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे या प्रकरणात बीड पोलिस हस्तक्षेप करू शकत नाहीत. त्यामुळे आमदार कदम यांना विश्रामगृहावर नेण्याच्या प्रकाराबद्दल मी काही सांगू शकत नाही. 
- जी. श्रीधर, पोलिस अधीक्षक, बीड
बातम्या आणखी आहेत...