आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवासी आश्रमशाळेतील मुलींची होणार विचारपूस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे समाजकल्याण विभागातर्फे प्रत्येक आश्रमशाळेतील मुलींची व्यक्तिशः विचारपूस करून काही तक्रार आहे का, याची चौकशी केली जाणार आहे. यासाठी तपासणी पथकात समाविष्ट करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षिकांची यादी समाजकल्याण आयुक्त, पुणे यांना पाठवण्याचे काम चालू आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला उघडकीस आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी मुलींवरील अत्याचाराच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. त्यानंतर आश्रमशाळांवरील पालकवर्गाचा विश्वास उडावा अशी स्थिती निर्माण झाल्याने समाजकल्याण विभागाने पूर्व खबरदारी म्हणून विद्यार्थिनींची विचारपूस करण्याचे काम हाती घेतले आहे.

या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून समाजकल्याण विभागाच्या १२ शिक्षकांची यादी समाजकल्याण आयुक्त कार्यालयाने मागवली आहे. या महिला कर्मचारी नेमून दिलेल्या दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन शाळांमधील विद्यार्थिनींची भेट घेऊन गैरप्रकार घडतात काय, याची माहिती घेणार आहेत. त्यासाठी या शिक्षिका विद्यार्थिनींना व्यक्तिशः भेटून विश्वासात घेणार आहेत. या कामासाठी जिल्ह्यातील १२ शिक्षिकांची यादी आयुक्त कार्यालयाला नुकतीच पाठवण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांची माहिती संकलित झाल्यावर बाहेरील जिल्ह्याचे पथक निवासी शाळांची तपासणी करणार आहे. तपासणीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला नसला तरी १२ वी परीक्षांच्या पूर्वीच म्हणजे डिसेंबर महिन्यात हा कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता आहे.

अडीअडचणींची चौकशी होणार
बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील अत्याचार प्रकरणामुळे समाजकल्याण विभागाकडून खबरदारी म्हणून निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींची विचारपूस करण्यात येणार आहे. त्यासाठी एका जिल्ह्याचे पथक दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन नेमून दिलेल्या शाळांमध्ये जाऊन हे काम करणार असून तपासणी कार्यक्रम अद्याप घोषित झाला नाही. - एस. ए. बारड, पर्यवेक्षक, समाजकल्याण शिक्षण विभाग.
बातम्या आणखी आहेत...