आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजकल्याण उपायुक्तांच्या घराची लातूरमध्ये झडती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर येथील माधव वैद्य यांच्या भाड्याच्या घराची झडती पुणे एसबीने केली. पथकातील डीवायएसपी श्रीहरी पाटील (हिरवा टी शर्ट) व अन्य. - Divya Marathi
लातूर येथील माधव वैद्य यांच्या भाड्याच्या घराची झडती पुणे एसबीने केली. पथकातील डीवायएसपी श्रीहरी पाटील (हिरवा टी शर्ट) व अन्य.
लातूर- पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी पुणे समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वैद्य यांच्या येथील भाड्याच्या घराची झडती घेतली. त्यात दोन लाख रुपये व काही फाइल्स पथकाच्या हाती लागल्या. त्या जप्त करण्यात आल्या आहेत.

लातूर येथे कार्यरत असताना वैद्य यांनी येथील साईधाम सोसायटीत ४१ क्रमांकाचे रो हाऊस भाड्याने घेतले होते. पुणे येथे एसीबीने वैद्य यांना अटक केल्यानंतर वैद्य हे यापूर्वी जेथे जेथे कार्यरत होते व राहत होते त्या ठिकाणांचीही झडती घेण्याचे एसीबीने ठरवले होते. या प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रे लातुरातही मिळू शकतात? अशी शंका त्यांना होती. त्यामुळे लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला वैद्य यांच्या घरास टाळे ठोकण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. त्यावरून मंगळवारी रात्री लातूर एसीबीने रो हाऊसला टाळे ठोकले होते. गुरुवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास पुणे एसीबीचे डीवायएसपी श्रीहरी पाटील, पोलिस निरीक्षक जालिंदर तांदळे, पी. एन. भोकरे, पी. एन. टिळेकर, नवनाथ माळी व अन्य दोन असे पथक साईधामध्ये धडकले. घराला लावलेल्या कुलपाची किल्ली नसल्याने अधिकारी व शासकीय पंचासमक्ष कुलूप तोडण्यात आले. त्यानंतर तपासणी सुरू झाली. ती सुमारे अडीच तास चालली. यात दोन लाख रुपये मिळाले. या रकमेबद्दल पोलिसांनी वैद्य यांना विचारले असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने ती जप्त करण्यात आली.

१८ फाइल्स मिळाल्या
झडतीत १८ फाइल्स मिळाल्या. या फाइल्स कार्यालयात असणे गरजेचे होते. तथापि त्या घरात सापडल्याने जप्त करण्यात आल्या आहेत. वैद्य यांना अटक केल्याप्रकरणाशी संबंधित एक फाइल या झाडाझडतीत मिळाली असून सर्वच फाइल्स संबंधित विभागाला देण्यात येणार असल्याचे पथकप्रमुख डीवायएसपी श्रीहरी पाटील यांनी सांगितले. दरम्यान, या पथकाने येथील समाजकल्याणच्या प्रादेशिक उपायुक्त कार्यालयासही भेट दिली.