आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Huge Load Shading At Riverside Area, Farmers In Trouble

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीज वितरणचे निर्बंध शेतक-यांच्या मुळावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर- भीषण दुष्काळाचे चटके सोसणा-या गोदाकाठच्या गावांना यंदाही वीजपुरवठ्याच्या निर्बंधांमुळे वरील धरणांतून सोडलेले पाणी मिळाले नाही. नगर जिल्ह्यातील गोदाकाठच्या गावांना आजही आठ तास सुरळीत वीजपुरवठा सुरू असून त्यांना नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. इकडे गंगापूर तालुक्यातील शेतक-यांना मात्र गोदापात्रातील पाणीवापरावर निर्बंध टाकण्यात आले असून वीजपुरवठाही सहा तासच सुरू आहे. या भेदभावामुळे गंगापूर तालुक्यातील शेतक-यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

गतवर्षी पडलेल्या तीव्र दुष्काळाने व जायकवाडीच्या बॅकवॉटरमध्ये अल्प पाणी राहिल्यामुळे शासनाने गंगापूर तालुक्यातील गोदाकाठच्या गावांमधील वीजपुरवठ्यावर निर्बंध आणले होते. सध्या गोदापात्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. गोदाकाठच्या गावांमधील नागरिकांना केवळ सहा तास वीज पुरवठा करण्यात येतो. जामगाव, कायगाव, गळनिंब, बगडी, अगरकानडगाव व इतर ठिकाणच्या ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांद्वारे नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी देणेदेखील अशक्य झाले आहे. धरण उशाला व कोरड घशाला अशी गत तालुक्यातील जनतेची झाली आहे.

शिवाय या वर्षी पावसाला चांगली सुरुवात झाल्यामुळे जायकवाडीमधून पाणी मिळेल या आशेने शेतक-यांनी खरिपासाठी बागायती पिकांची लागवड केली होती. मात्र केवळ सहा तास वीजपुरवठा असल्यामुळे या भागातील पिके जळून जाण्याची वेळ आली आहे. पिके जगवण्यासाठी वीजपुरवठा किमान आठ तास करणे गरजेचे आहे.

नगर, औरंगाबाद जिल्ह्यातील अंमलबजावणीतील विरोधाभास : शासनातर्फे जायकवाडीचे पाणी पिण्यासाठी आरक्षित राहावे यासाठी कठोर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश काढले जातात. त्यामध्ये शेतक-यांचा कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करणे, मोटारी जप्त करणे, गोदाकाठच्या गावांना चार किंवा सहा तास वीजपुरवठा करणे अशा निर्णयांचा समावेश असतो. औरंगाबाद जिल्ह्यातील प्रशासन व पाटबंधारे विभागाचे अधिकारी शासन निर्णय पोहोचल्याबरोबर त्याची तत्परतेने अंमलबजावणी करतात. याउलट नगर जिल्ह्यातील कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव तालुक्यांतील राजकीय पुढारी प्रशासनावर दबाव आणतात. गोदाकाठच्या सिंचनासाठी जास्तीत जास्त वेळ वीजपुरवठा मिळवण्यात ते यशस्वी होतातही. मराठवाड्यातील शेतक-यांवर यामुळे अन्याय होतो.

नेवासा, शेवगावमध्ये आठ तास वीज
नाशिक जिल्हा व भंडारदरामधून येणारे जायकवाडीचे हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळण्याऐवजी त्यावर डल्ला मारण्यासाठी नगर जिल्ह्यातील मंडळी कायम टपलेली असतात. कोपरगाव तालुक्यातील पुढारी राजकीय दबाव टाकून नांदूर-मधमेश्वरच्या डाव्या-उजव्या कालव्यातून पाणी पळवतात, तर गंगापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नेवासा, शेवगाव, श्रीरामपूर तालुक्यांतील शेतकरी व पुढारी महावितरणच्या अधिकारी व कर्मचा-यांना हाताशी धरून आठ-दहा तास वीजपुरवठा सुरू ठेवून जायकवाडीच्या पाण्याचा उपसा करत आहेत.

अनेकांच्या तक्रारी
यासंदर्भात गंगापूर तालुक्यातून अनेकांच्या तक्रारी आल्या आहेत. आमची भूमिकादेखील गोदाकाठच्या गावांना आठ तास वीज देण्याची आहे. परंतु शासनाच्या पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याच्या आदेशामुळे ते सहा तास करण्यात आले आहे. जनतेच्या भावना आम्ही जिल्हाधिका-यांना कळवल्या आहेत.
आदिनाथ सोनवणे, अधीक्षक अभियंता, महावितरण, औरंगाबाद ग्रामीण

गंगापूर तालुक्यातील गोदाकाठच्या गावांवर कमी वीजपुरवठ्यामुळे होत असलेल्या अन्यायाविरोधात पालकमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. पुढील आठवड्यात त्याचा पाठपुरावा करून वीजपुरवठा 8 तास न झाल्यास त्यासाठी आंदोलन करण्यात येईल.
किरण पाटील डोणगावकर

या गावांतील पिके धोक्यात : नेवरगाव, हैबतपूर, कानडगाव, ममदापूर, बगडी, जामगाव, कायगाव, अंमळनेर, गणेशवाडी, गळनिंब, अगरवाडगाव, धानोरा, सावखेडा, भेंडाळा यांच्यासह तीस ते चाळीस गावे.