आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसटी बस आगाराला ताकीद देण्याचा ‘मानव विकास’चा आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - मागास भागातील मुलींसाठी असलेल्या मानव विकास मिशनच्या बसमध्ये इतर प्रवाशांची घुसखोरी होत असल्याचे वृत्त दैनिक ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित करताच औरंगाबाद येथील मानव विकास आयुक्त कार्यालयाने वृत्ताचे कात्रण येथील जिल्हा समन्वय कार्यालयाला फॅक्सद्वारे पाठवून खुलासा मागवला आहे. आगाराला ताकीद देण्यात यावी, असे आदेशही आयुक्तांनी हिंगोलीच्या जिल्हा समन्वयकांना दिले आहे.


हिंगोलीला मानव विकासच्या 15 बसमधून ग्रामीण भागातील मुलींची तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी ने-आण केली जाते. शाळेच्या वेळेत केवळ मुलींना पोहोचवणे आणि नंतर पुन्हा गावात आणून सोडणे एवढेच काम या बसच्या माध्यमातून अपेक्षित आहे. उर्वरित वेळेत मात्र या बसला व्यावसायिक फेºया मारण्याची मुभा आहे. शनिवारी शाळा पहिल्या सत्रानंतर म्हणजेच दुपारी 12 वाजता संपते. असे असतानाही 3 ऑगस्ट रोजी शनिवारी दुपारी 12.30 वाजता सिरसम-हिंगोली-सिरसम या बसने (एमएच- 06 एस- 8809) इतर प्रवाशांनी प्रवास केला. यामुळे विद्यार्थिनींना ताटकळत उभे राहूनच प्रवास करावा लागला. हा प्रसंग केवळ प्रातिनिधिक स्वरूपाचा असून जिल्हाभरातील 15 बसमध्ये असेच प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. ‘दिव्य मराठी’ने 6 ऑगस्ट रोजी या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताचे कात्रण फॅक्स करून खुलासा मागवणारे पत्र सकाळी 11 वाजताच हिंगोली येथील मानव विकासचे जिल्हा समन्वयक एम. एन. राऊत यांना प्राप्त झाले. हे पत्र औरंगाबाद येथील मानव विकास आयुक्त कार्यालयातून प्राप्त झाले आहे. हा प्रकार गंभीर असून त्याची शहानिशा करण्यात यावी आणि परिवहन आगाराला ताकीद देण्यात यावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा समन्वयक राऊत यांनीही तातडीने आगारप्रमुखांकडून लेखी खुलासा मागवला आहे.


वाहकांची दुकानदारी
मानव विकासच्या बस शाळा भरणे आणि सुटण्याच्या वेळेत मुलींच्या दिमतीला असतात, परंतु एखाद्या वेळी विद्यार्थिनींची संख्या कमी असली तर इतर प्रवाशांना प्रवेश मिळतो. तसेच मार्गावरील थांब्यावर असलेल्या प्रवाशांनाही घेतले जाते. परिणामी विद्यार्थिनींना घरी जाण्यासाठी उशीर होतो आणि इतर प्रवाशांचा त्रासही सहन करावा लागतो. याकडे वाहकांचा कानाडोळा असतो. इतर प्रवाशांकडून पैसे घेऊन तिकीट न देताच दुकानदारी सुरू असल्याचेही विद्यार्थिनींनी सांगितले.