आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवतचे मंडळ निरीक्षक लाच घेताना अटकेत, फेर लावण्यासाठी केली होती मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - वडिलोपार्जित शेतीचा फेर लावून देण्यासाठी शेतकऱ्याकडे चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना मंडळ निरीक्षक संजय काकडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. १०) रात्री साडेआठच्या सुमारास सेलूत रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

मानवत तहसीलअंतर्गत एका शेतकऱ्याने त्यांच्या वडिलोपार्जित शेतीचा फेर लावण्यासाठी त्यांच्या गावासाठी असलेले मंडळ अधिकारी संजय काकडे यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. परंतु काकडे यांनी ही प्रक्रिया करून देण्यासाठी त्यांच्याकडे ४००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मंडळ अधिकारी काकडे यांच्याविरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी (दि. १०) रात्री सेलू-पाथरी रस्त्यावर रेल्वेगेटजवळ असलेल्या सागर रेस्टॉरंट येथे सापळा रचला. यात मंडळ अधिकारी संजय लक्ष्मण काकडे यांनी रात्री साडेआठच्या सुमारास शेतकऱ्याकडून ती रक्कम स्वीकारली. त्याच वेळी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडून लाचेची रक्कम हस्तगत केली. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलिस उपअधीक्षक एन. एन. बेबडे, पोलिस निरीक्षक अनिल गव्हाणकर आदींनी पुढाकार घेतला.