आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Husband Tourched Wife Due To Give Birth Girl In Mazalgaon

माजलगावमध्‍ये मुलगी झाल्याने पत्नीस पेटवले, पतीला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - पहिली मुलगीच झाल्याने पतीने पत्नीला पेटवून दिले. शंभर टक्के भाजलेली विवाहिता बीडमध्ये रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. माजलगाव शहरात गुरुवारी पहाटे ही घटना घडली. घटनेनंतर फरार पतीसह सास-यास माजलगाव पोलिसांनी बीडमध्ये अटक केली.
माजलगाव शहरातील अन्वर खान ऊर्फ बाबा पठाण भंगारवाले यांचा मुलगा अकबर हा मानवत (जि. परभणी) येथे आरोग्य विभागात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहे. 11 नोव्हेंबर 2012 रोजी अकबर याचे लग्न दुलेगाव (ता. लोहा, जि. नांदेड) येथील सय्यद अब्दुला यांची मुलगी झरिनाशी झाले. काही महिन्यांनंतर झरिनाचा छळ सुरू झाला. तू पसंत नाहीस, माझा पहिला प्रेमविवाह झालेला आहे, हे मुद्दे पुढे करून अकबर तिचा छळ करू लागला. सासरच्यांकडूनही छळ सुरूच झाला.
दरम्यान, नोव्हेंबर 2013 मध्ये झरिनाने गोंडस मुलीला जन्म दिला. बाळंतपणासाठी माहेरी दुलेगावला गेलेली झरिना तिकडेच होती. मुलगी झाल्याने पती अकबर, सासरा अन्वर खान, सासू समिया अन्वर खान पठाण, दीर आमीरखान पठाण, नणंद बेनझीर हे मात्र नाराज झाले. त्यांना मुलगा पाहिजे होता. बाळंतपणानंतर झरिना सासरी नांदण्यास आली. घरात मुलाऐवजी मुलगी पाहिल्यानंतर तिरस्कार वाढतच गेला.
सहा फेब्रुवारीला मध्यरात्री याच कारणावरून घरात भांडण सुरू झाले. भांडणात पती, सासू, सासरा यांनी झरिनाकडून तीन महिन्यांची मुलगी हिसकावून घेतली. यानंतर झरिनाच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यात झरिना शंभर टक्के भाजली. तिला बीडला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या ती मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी माजलगाव पोलिसांनी झरिना पठाण हिच्या तक्रारीवरून पती अकबर, सासरा अन्वरखान पठाण, सासू समिया, दीर आमीरखान आणि बेनझीर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.