आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच वर्षांनंतर पोलिसांनी घडवले पती-पत्नीचे मनोमिलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड - घरातून रागाच्या भरात निघून गेलेल्या विवाहितेचा अडीच वर्षांनंतर पाचोड (ता. पैठण) पोलिसांनी शोध घेऊन त्याच्या उसवलेल्या संसाराची घडी बसवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून मनोमिलन घडवून आणले.

खेर्डा (ता.पैठण) येथील सुनीता ज्ञानेश्वर पानसे (३५) ही विवाहिता जानेवारी २०१४ मध्ये पतीसोबत कुरबुर झाल्याने कुणाला काही न सांगता घरातून निघून गेली होती. नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. विवाहितेचा पती ज्ञानेश्वर पानसे याने पाचोड पोलिसांत पत्नी सुनीता बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. याप्रकरणी पाचोड पोलिसांसह बेपत्ता सुनीताच्या नातेवाइकांनी तिच्या शोधासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

पाचोड पोलिसांनी विविध पोलिस ठाण्यांना बेपत्ता ( मिसिंग ) सुनीताचे वर्णन व छायाचित्र पाठवून तपासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. वर्षामागून वर्षे सरली, अडीच वर्षांचा काळ उलटला, मात्र त्याचा पत्ता लागत नव्हता. अखेर पोलिसांना शेगाव (जि. बुलडाणा) येथील गजानन महाराजांच्या मंदिरात संगीतासारख्याच वर्णनाची महिला असल्याची माहिती मिळाली.

पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी संबंधित महिलचे भाऊ, पती, सासऱ्यास यासंबंधी कल्पना देऊन शेगाव येथे जाऊन संगीताची खातरजमा करण्यासंबंधी पाठवले. ते सर्वजण शेगावला गेले. त्यांनी संगीताला ओळखले.

मात्र तिने "मी ती नव्हेच'चा पवित्रा घेतला. रविवारी सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत तिच्या पतीसह सासरा, भावास घेऊन शेगाव येथे गेले. तिला राग विसरून घरी परत चालण्यासाठी विनंती केली.

अखेर संगीताने भावनेला वाट मोकळी करत घरी परतण्याची तयारी दर्शवली. पोलिस व नातेवाइकांनी तिला पाचोड पोलिस ठाण्यात आणले हे समजताच नातेवाइकांनी ठाण्यात गर्दी केली. सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. पोलिसांच्या साक्षीने अखेर संगीता पतीसोबत तब्बल अडीच वर्षांनंतर सासरी गेली.
बातम्या आणखी आहेत...