कुर्डुवाडी / उस्मानाबाद - अत्याचारी निझामाच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर १८ सप्टेंबर १९४८ रोजी प्रतिसरकार बरखास्त करून मंत्रालयावरून उतरविलेला ध्वज तब्बल ६६ वर्षांनंतर बुधवारी पुन्हा मंत्रालय म्हणून वापरात आलेल्या वाड्यावर फडकावण्यात आला आणि स्वातंत्र्याचा वेगळा आनंद प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर झळकला. जामगाव (ता. माढा) येथे हैदराबाद मुक्तिदिनाचा पहिला सोहळा बुधवारी साजरा झाला. या स्वातंत्र्य सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी मराठवाडा निजामांच्या दहशतीखाली होता. माढा, बार्शी, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यात असलेली ५२ गावेही १९४७ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात होती. या गावांनी एकजूट दाखवून निजामाची जुलमी राजवट नाकारली आणि निजामांची बंधने मोडून स्वतंत्र मुक्तापूर स्वराज्य नावाचे राज्य स्थापन केले. त्याची राजधानी असलेल्या जामगावमध्ये बुधवारी प्रथमच ध्वजवंदन सोहळा झाला. सकाळपासूनच गावात उत्साह, हर्षोल्हासाचे वातावरण होते. विठ्ठलराव पाटील प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी जयघोषात प्रभातफेरी काढली. ग्रामस्थांनी घरासमोर रांगोळ्या काढून त्याचे स्वागत केले. स्वातंत्रसैनिक संदिपान गायकवाड , प्रा. डॉ. सतिश कदम व उस्मानाबादचे वसंत नागदे यांच्या यांच्या उपस्थितीत सकाळी ९.३० ला ध्वजारोहण झाले.
असे होते मुक्तापूर स्वराज्याचे मंत्रिमंडळ
मुक्तापूर स्वराज्याचे स्वतंत्र मंत्रिमंडळ होते. मुख्य प्रशासक : कॅप्टन व्यंकटेश जोशी, संरक्षण खाते : राजेंद्र देशमुख, मदतनीस : शेषेराव वाघमारे, रामचंद्र मंत्री, पुरवठा खाते : रामभाऊ जाधव, विठ्ठलराव पाटील जामगावकर, अर्थ खाते : नरहरराव मालखरे, विनायक कुलकर्णी, न्याय खाते : वसंतराव देशमुख, नानासाहेब चिंचोले, आरोग्य खाते : आचार्य व्यासाचार्य संदीकर, शिक्षण खाते : शिवरकर गुरूजी, सामान्य प्रशासन : चंद्रशेखर बाजपेयी, हेर खाते : भागवान तोडकरी, मनोहर टापरे, टपाल खाते : जयकुमार अजमेरा, दत्तात्रय गणेश, प्रसिद्धी खाते : वसंतराव देशमुख, प्रभाकर जाधव